जळगाव जि.प.चे अध्यक्ष मुंबईला राहतील तर कामकाज कसे चालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:29 PM2018-08-11T12:29:29+5:302018-08-11T12:32:52+5:30
उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांचा सवाल
जळगाव : जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेवरून सुरु असलेली भाजपामधील धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष जर मुंबईमधून कामकाज चालवित असतील तर सभा रद्द होण्याची नामुष्की ओढवणार असल्याचे जि.प.उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
जिल्हा परिषदेतील निधीच्या नियोजनासाठी गटनेते पोपट भोळे यांनी जि.प. अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर सभा ठरली होती. मात्र ही सभा रद्द करण्याचे कारण काय? हे आपल्याला समजले नसल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षांच्या दिरंगाईमुळेच निधी खर्च होत नसल्याचा आरोप नंदकुमार महाजन यांनी केला. नियोजनावरून सत्ताधारी पक्षातच फुट पडून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.
गटनेत्यांनी चर्चा करूनच सभा ठरवली
जिल्हा परिषदेचा निधी वेळेत खर्च व्हावा यासाठी गटनेते पोपट भोळे, सदस्य मधुकर काटे व सभापती आपल्या दालनात आले होते. गटनेत्यांनी सर्वसाधारण सभा आयोजित करण्याबाबत अध्यक्षांसोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधत २३ तारीख निश्चित केली होती. सभेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर सभेची तारीख निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले.
सहीसाठी अध्यक्षांनी मागविला फॅक्स
अध्यक्ष हे मुंबईला होते. त्यात अजेंड्यावर सही करण्याच्या अडचणी असल्याने अध्यक्षांना अजेंडा फॅक्स करून त्यावर सही करण्याचे देखील ठरले. नियोजनाचा निधी खर्च वेळेवर होण्यासाठी ही कसरत सुरू असतांना त्यांनी सभा रद्द का केली हे आपल्याला समजले नसल्याचे उपाध्यक्ष महाजन यांनी सांगितले.
नियोजन अध्यक्षांमुळे बारगळले
दोन महिन्यांपासून निधी आल्यानंतर देखील नियोजन झाले नाही. त्यात गेल्या महिन्यातच अध्यक्षांनी सर्वसाधारण सभा आयोजित केली नाही. पण ज्या प्रयोजनासाठी सभा घेतली त्यात नियोजनाचे विषय ठेवले नाही. अध्यक्षांनी विषयच पटलावर ठेवले नाही. त्यामुळे पुन्हा सभा घेण्याची नामुष्की ओढवली असा आरोप देखील उपाध्यक्षांनी केला.