किती शेतकरी कर्ज घेऊन ‘एफडी’ करतात - पालकमंत्र्यांचा अजब प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:33 PM2019-05-19T12:33:06+5:302019-05-19T12:33:22+5:30
आढावा बैठकीत सर्वच अवाक्
जळगाव : जिल्ह्यात किती शेतकरी कृषी कर्ज घेऊन त्याची ‘एफडी’ करतात, असा अजब सवाल खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कृषी आढावा बैठकीत उपस्थित केला. या प्रकाराने सर्वच जण अवाक् झाले.
चंद्रकांत पाटील हे शनिवारी दुष्काळी पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आले असताना संध्याकाळी जिल्हा नियोजन भवन येथे त्यांनी कृषी आढावा घेतला. त्यात त्यांनी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासह कृषी कर्ज, नाबार्डचे नियोजन यांचाही आढावा घेतला. या सोबतच पिक कर्जाबाबत बोलताना कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले की नाही, असा सवाल अधिकाऱ्यांना विचारला. त्या सोबतच वादग्रस्त ठरू शकेल, असे वक्तव्यही केले. त्यात ते म्हणाले की, जिल्ह्यात असे किती शेतकरी आहे, जे कर्ज घेऊन बँकांमध्ये ‘एफडी’ करतात. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले.
एकीकडे बँका शेतकºयांना कृषी कर्जासाठी फिराफीर करायला लावत आहे. सोबतच जिल्हा बँकेकडूनही केवळ ३२ हजार शेतकºयांना ९३ कोटींचे कर्ज वाटप होण्यासह त्यातही केवळ ५० टक्केच कर्ज दिले जात असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असताना पालकमंत्री असे वक्तव्य करीत असतील तर शेतकºयांनी काय करावे, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.