विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लुट आणखी किती दिवस चालणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:05 AM2021-07-13T04:05:51+5:302021-07-13T04:05:51+5:30
सचिन देव जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने सध्यस्थितीला बहुतांश रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या ...
सचिन देव
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने सध्यस्थितीला बहुतांश रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना कोरोनाच्या नावाखाली फेस्टीव्हल आणि स्पेशल गाड्यांचा दर्जा देऊन, प्रवाशांची अक्षरश: लुट केली जात आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा विशेष दर्जा आणि त्यातील आरक्षणाची सक्ती बंद करून पूर्वीप्रमाणे या गाड्या सर्व सामान्य प्रवाशांसाठी खुल्या करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षा काही महिने रेल्वे सेवा पूर्णपणे टप्प होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्याने आतापर्यंत ७० टक्के रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना सुरूवातीपासून विशेष व उत्सव गाड्यांचा दर्जा दिला आहे. हा दर्जा देतांना जनरल तिकीट बंद ठेवले असून, आरक्षण असणाऱ्या प्रवाशानांच प्रवास करण्याची सक्ती केली आहे. तसेच कोरोनापूर्वी या गाड्यांचे जे तिकीट दर होते, त्याहून काही प्रमाणात जास्त तिकीटाच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसत आहे.
इन्फो :
प्रवासी म्हणतात...
रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षांपासून या गाड्यांना विशेषचा दर्जा देऊन, भरमसाठ तिकीट दर लागू केले आहेत. यामुळे सर्व सामान्य गरिब प्रवाशांनाच आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेषचा दर्जा हटवुन, सर्व सामान्यासांठी या गाड्यांना तिकीट उपलब्ध करून द्यावे, ही प्रवासी म्हणून मागणी आहे.
सुनील येवले, प्रवासी
कोरोना काळात फेस्टीव्हल आणि विशेष गाड्या सुरू असल्या तरी, या गाड्यांना आता प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे रेल्वेला आता प्रचंड उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गाड्यांचा विशेषचा दर्जा हटवुन प्रवाशांची लुट थांबवावी.
योगेश पाटील, प्रवासी
इन्फो :
आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी
- कोरोना काळात प्रवाशांची रेल्वे गाड्यांना गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने आधीच सर्व पॅसेंजर सेवा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे गर्दीवर काहीसे नियंत्रण आहे. तसेच सध्या ज्या फेस्टीव्हल व विशेष गाड्या सुरू आहेत. त्या गाड्यांना गर्दी कमी राहण्यासाठी तिकीट आरक्षण बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांचा रेल्वेचा प्रवास दुरापास्त झाला आहे.
- या गाड्यांना आरक्षण केल्यामुळे स्थानिक प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे अवघड झाले आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट व मासिक पासही बंद करून ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आरक्षणाची सक्ती बंद करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.
इन्फो
तिकीटात २५ ते १०० रूपयांपर्यंत फरक
पूर्वी जळगाव ते चाळीसगाव दरम्यान एक्सप्रेसची सर्व साधारण तिकीट ५० रूपये होते. आता हे तिकीट आरक्षणामध्ये ६५ तर काही गाड्यांना ७५ रूपये आहे. तसेच जळगावहून मुंबईचे तिकीट २५० ते २७५ रूपयांपर्यंत होते. आता हेच तिकीट ३८० ते ४०० रूपयांपर्यंत मिळत आहे.