किती हा बिनधास्तपणा; मास्क, सॅनिटायझरचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:07 AM2021-08-02T04:07:32+5:302021-08-02T04:07:32+5:30

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाला तसे नागरिक अगदी बिनधास्त झाले आहेत. मास्क, सॅनिटायझर, ...

How much this indifference; Forget masks, sanitizers | किती हा बिनधास्तपणा; मास्क, सॅनिटायझरचा पडला विसर

किती हा बिनधास्तपणा; मास्क, सॅनिटायझरचा पडला विसर

Next

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाला तसे नागरिक अगदी बिनधास्त झाले आहेत. मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉशचा जणू त्यांना विसर पडल्याने सॅनिटायझरचे उत्पादन व मागणी १० टक्क्यांवर आली आहे. मास्कचीही तशीच स्थिती आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागले असून, जळगावकरांनीही वेळीच गांभीर्य ओळखले नाही तर तिसरी लाट केव्हाही धडक देऊ शकते, असा इशारा दिला जात आहे.

बचाव करणाऱ्या साधनांची मागणी घटली

कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क लावणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे यांचे पालन करणे गरजेेचे असताना आता नागरिक सॅनिटायझरचा क्वचित वापर करताना दिसून येत आहे. याचे उदाहरण म्हणजे कोरोनाचा संसर्ग ज्यावेळी स‌र्वाधिक होता त्यावेळी मार्च-एप्रिल महिन्यात जळगावात दररोज सॅनिटायझरचे दोन हजार लिटरचे उत्पादन होत असे. आज हे उत्पादन २०० लिटरवर आले आहे. अशाच प्रकारे जळगावच्या उत्पादनासह इतर शहरातून आलेल्या सॅनिटायझरची विक्री पाहिली असता तीदेखील १० टक्क्यांवर आली आहे. पूर्वी दररोज १०० मिली लिटरच्या १०० बाटल्या विक्री होत असे त्या आता केवळ दहावर आल्या आहेत. मास्कचीदेखील अशीच स्थिती असून, ज्या ठिकाणी २०० मास्क विक्री होत असे तेथे आता केवळ २० मास्कची मागणी आहे. तसेच हॅण्डवॉशची मागणी २० टक्क्यांवर आली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

तिसरी लाट दारावर, सॅनिटायझरचा वापर आ‌वश्यक

कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही, याविषयी वेगवेगळे भाष्य केले जात असले तरी सध्या दक्षिण भारत तसेच महाराष्ट्रात कोकण, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली असून नागरिकांनी अजूनही गर्दीत मिसळल्यास अथवा सॅनिटायझर व मास्कचा वापर न केल्यास आपल्याकडेदेखील केव्हाही तिसरी लाट धडक देऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे त्रिसूत्रीचा अवलंब आ‌वश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

सॅनिटायझर, हॅण्डवॉश, मास्कची बोलती संख्या

घटक-एप्रिल २०२१-जुलै २०२१

सॅनिटायझर उत्पादन-२००० लिटर-२०० लिटर

हॅण्डवॉश मागणी- १०० बॉटल-१० बॉटल

मास्क मागणी- २००-२०

कशामुळे वापर टाळता?

सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असून सॅनिटायझर वापरत नाही. शिवाय कुणाशी हात मिळवत नसल्याने सॅनिटायझरची आवश्यकता भासत नाही. मास्क लावल्यास घाम अधिक येतो.

- दिलीप चौधरी, जळगाव

कोरोनाचा अधिक संसर्ग होता त्या वेळी नियमित हात धुणे व सॅनिटाइज करीत असे. मात्र आता संसर्ग कमी असल्याने भीतीही कमी झाली असून, रुग्णसंख्या जास्त नसल्याने तशी गरजही वाटत नाही.

-संजय मोरे, जळगाव

———————-

कोरोना रोखण्यासाठी सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र सध्याची स्थिती पाहता नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने वेळीच काळजी घेणे महत्त्वाचे असून, निष्काळजीपणा केल्यास केव्हाही तिसरी लाट येऊ शकते.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

कोरोनाचा संसर्ग अधिक होता, त्यावेळी दररोज दोन हजार लीटर सॅनिटायझरचे उत्पादन होत असे. आता हे उत्पादन २०० लिटरवर आले आहे. मागणी घटल्याने उत्पादनही कमी झाले आहे.

- सुमित काबरा, सॅनिटायझर उत्पादक

मार्च-एप्रिल महिन्यात सॅनिटायझर, मास्कची यांची मागणी अधिक होती. आता ती केवळ १० टक्क्यांवर आली आहे. अशाच प्रकारे हॅण्डवॉशची मागणीदेखील २० टक्क्यांवर आली आहे.

- सुनील भंगाळे, अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट मेडिसीन डीलर असोसिएशन

Web Title: How much this indifference; Forget masks, sanitizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.