डेल्टा प्लसला रोखणार कसे, दोन्ही डोस घेणारे २१ टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:11 AM2021-07-04T04:11:55+5:302021-07-04T04:11:55+5:30
जळगाव : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने मध्यंतरी खळबळ उडाली होती. मात्र, हे ...
जळगाव : लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने मध्यंतरी खळबळ उडाली होती. मात्र, हे सातही रुग्ण बरे झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. मात्र, आगामी काळात डेल्टा प्लसचे संकट राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील २१ टक्केच नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे डेल्टा प्लसला रोखणार कसे, असाही एक प्रश्न समोर येत आहे.
सद्यस्थिती जिल्हाभरात ३५०पेक्षा अधिक केंद्र आहेत. मात्र, लसींचा पुरवठा हा त्या मानाने होत नाही. त्यामुळे यापैकी ६० टक्क्यांपेक्षा अधिक केंद्र हे आठवड्यातून तीन ते चार दिवस बंद राहत आहे. मध्यंतरी शहराला लसीचा मोठा साठा मिळाला होता. मात्र, तीनच दिवसांत तोही संपला. पुन्हा तीन दिवस केंद्र बंद होती. शनिवारी काही प्रमाणात केंद्र सुरू झाली होती. पुरवठ्यामुळे लसीकरणावर परिणाम होत असून १८ ते ४४ वयोगटांचे लसीकरण हे सर्वांत कमी झाले आहे. त्यामुळे लसींचा मुबलक साठा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
१८ ते ४४ वयोगटांचे केवळ ६ टक्के
- १८ ते ४४ वयोगटांच्या लसीकरणाला सर्वांत शेवटी सुरुवात झालेली होती. मात्र, काही दिवस लसीकरण होताच दीड महिना या वयोगटाचे लसीकरण बंद करण्यात आले होते.
- त्यातच कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर हे वाढवून ८४ दिवसांचे करण्यात आले. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांना दुसऱ्या डोससाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा वाढली. त्यातच केंद्रांवर लसी उपलब्ध नसल्याने पहिला डोसही मिळत नसल्याने हा कालावधी आणखीनच पुढे जात आहे.
- १८ ते ४४ वयोगटांच्या ५४,९६६ नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर वगळता सामान्यांनी एकानेही लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याची नोंद आहे. कोव्हॅक्सिनमध्ये १५ हजारांवर तरुणांनी लसीचा पहिला डोस घेतला असून, ९ हजारांवर दुसरा डोस झाला आहे. हे प्रमाणही अत्यल्प आहे. लोकसंख्या १४ ते १६ लाख ग्राह्य धरली जात असताना या वयोगटांचे लसीकरण कमी आहे.
एकूण लसीकरण
६,८०,६६०
पहिला डोस ५,३४,५६८
दुसरा डोस १,४६,०९२
तालुकानिहाय
अमळनेर १६,८८०
भुसावळ ५६,४४४
बोदवड ५,८५७
भडगाव ८,९१७
चाळीसगाव १५,१७७
चोपडा ११,९२४
धरणगाव ४,१४७
एरंडोल ७,७३९
जामनेर १३,९०८
मुक्ताईनगर ८,५६४
पाचोरा १५,१३५
पारोळा ९,७८०
रावेर १७,६०९
यावल १६,१११
जळगाव १,१९,६१४
प्राथमिक आरोग्य केंद्र २,३६,५४१
उपकेंद्र - ६२,४३७
खासगी रुग्णालय - ४८,२७५
जळगावात सर्वाधिक लसीकरण
जळगाव तालुक्यात सर्वाधिक १ लाख १९ हजार ६१४ नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोनही डोस घेतले आहे, तर सर्वांत कमी लसीकरण हे बोदवड तालुक्यात झाले आहे. बोदवड तालुक्यात दोनही डोस घेणाऱ्यांची संख्या ही ५,८५७ आहे.