वाघ वाचणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:29 PM2018-08-21T12:29:28+5:302018-08-21T12:29:41+5:30

How to read the tiger? | वाघ वाचणार कसे?

वाघ वाचणार कसे?

Next

- मिलिंद कुलकर्णी
मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील पूर्णा नदीपात्रात आढळून आलेल्या वाघाच्या मृतदेहाविषयी कारणाचा उलगडा झाला आहे. उसाच्या शेतात मुक्कामी असलेल्या वाघाला तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडून ठार मारण्यात आले. वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नायलॉनच्या दोरीने बांधून बैलांकरवी हा मृतदेह फरफटत नदीपात्राजवळ नेण्यात आला. तेथे तो पाण्यात ढकलून देण्यात आला. पाणी पिण्यासाठी आलेला वाघ बुडून मेल्याची बतावणी करण्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा प्रयत्न फसला आहे. उसाच्या शेतात वाघाचे केस आढळले असून शेतापासून नदीपात्रापर्यंत फरफटल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. वनविभागाने चौघा शेतकºयांना अटक केली आहे. पुढील कारवाई कायद्यानुसार होईल, पण वाघाच्या हत्येनंतर मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रातील वाघांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन महिन्यापूर्वीच एका वाघीणीचा मृत्यू झाला. ती वृध्द असल्याचे वनविभागाचे म्हणणे होते. त्यापूर्वीही सातत्याने वाघाचे मृत्यू, अपघाती मृत्यू घडत आहेत. दुर्देवाने स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधी, वनविभाग आणि वन्यजीवप्रेमी व्यक्ती आणि संस्था घटना घडल्यावर चर्चा करतात, मात्र नंतर पाठपुरावा होत नाही, हे वास्तव आहे. व्याघ्र संचार मार्ग, अधिवास क्षेत्र, सौर कुंपण, डोलारखेडा येथील शेतकºयांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. व्याघ्र संरक्षण रॅली काढली जाते. व्याघ्र परिषदा होतात. पण त्यात बाहेरगावाहून येणारे वक्ते भाषणे देतात; स्थानिक टाळ्या वाजवतात आणि सोहळा संपतो. पुन्हा पुढील वर्षी ‘ये रे माझ्या मागल्या’ असे होते. रोही, रानडुक्कर यांचा मोठा उपद्रव शेतकºयांना होतो. अन्नसाखळी असल्याने या प्राण्यांचा पाठलाग वाघ करतो आणि गारव्यामुळे केळी वा उसाच्या शेतात मुक्काम ठोकतो. तशा अर्थाने वाघ माणसाळलादेखील आहे. पण रोही, रानडुक्करांना मारण्याची परवानगी वनविभागाने दिली असली तरी ती प्रक्रिया सोपी नाही. वाघ गायब झाल्यावर विदर्भात रान पेटते. गहजब होतो. याठिकाणी तर लागोपाठ दोन वाघांचे मृत्यू झाले तरी प्रशासन गाढ झोपेत आहे. कागदे रंगवित आहे. शतकोटी वृक्ष लागवडीचा संकल्प चांगला असला तरी वन्यप्राणी नसतील, तर जंगल काय कामाचे?

Web Title: How to read the tiger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.