माकडाच्या मानेत अडकला गडू त्याला कसे काढू
By admin | Published: May 28, 2017 05:18 PM2017-05-28T17:18:06+5:302017-05-28T17:18:06+5:30
तोंडापूर गावात तहान भागवितांना माकडाच्या पिल्लावर ओढवलेली नामुष्की
Next
ऑनलाईन विशेष/ कैलास कोळी
तोंडापूर, जि.जळगाव : उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी गावाकडे धाव घेतलेल्या माकडाच्या समुहातील पिल्लाने उचललेला स्टिलचा गडू (तांब्या) शनिवारी त्याच्या डोक्यात अडकला. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे माकडाचे पिल्लू रडकुंडीला आले असताना पिल्लाची सुटका करण्यासाठी पिल्लाच्या आईसह, ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचा:यांची मात्र कसरत होत आहे.
जंगलात मानवी अतिक्रमण वाढल्याने चारा व पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहेत. शनिवारी 20 ते 22 माकडांचा कडप पाण्याच्या शोधासाठी तोंडापूर (ता.जामनेर) गावात दाखल झाला. माकडाच्या कडपातील एका पिल्लाला अंबिका नगरातील एका घराजवळ गडू (तांब्या) दिसला. तहान भागविण्यासाठी पिल्लाने त्याच्यामध्ये मान टाकली. मात्र या गडूमध्ये पाणी नसल्याने तो मानेत फिट्ट बसला. पाणी नाही आणि मानही बाहेर काढता येत नसल्याने माकडाच्या पिल्लाची गडू काढण्यासाठी धडपड सुरु झाली. काही ग्रामस्थांनी पुढे येत पिल्लाच्या मदतीसाठी प्रयत्न केला, मात्र माकडांच्या समुहाने ग्रामस्थांवर हल्ला चढविला. रात्रीर्पयत कडपातील माकड डोक्यातील गडू काढतील या आशेने ग्रामस्थ वाट पाहत होते. मात्र रविवारी सकाळी पिल्लासह माकडाचा कडप जंगलाच्या दिशेने रवाना झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी ही बाब वनविभागाला कळविली. त्यानुसार वनपाल ललित गवळी व वनरक्षक संदीप पाटील यांनी तोंडापूरात दाखल होत पिल्लाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र वनविभागाच्या कर्मचा:यांना पाहून माकडाचा कडप दूर पळत होता.
दोन दिवसांपासून या पिल्लाच्या पोटात अन्नाचा कण किवा पाणी न गेल्याने ते अशक्त झाले आहे. पिल्लाला वाचविण्यासाठी आईची अयशस्वी धडपड मात्र सुरु आहे.