प्रत्येकवेळी भावनांचा उद्रेक कसा थांबवायचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:17 AM2021-05-06T04:17:27+5:302021-05-06T04:17:27+5:30
मराठा आरक्षण निकाल : पोलीस दलाच्या बैठकीत समाजातील मान्यवरांचा सवाल जळगाव : मराठा समाजाने प्रत्येक वेळी सामाजिक भान ठेवून ...
मराठा आरक्षण निकाल : पोलीस दलाच्या बैठकीत समाजातील मान्यवरांचा सवाल
जळगाव : मराठा समाजाने प्रत्येक वेळी सामाजिक भान ठेवून मोर्चे काढले, आंदोलने केली. प्रत्येक वेळी भावनांचा उद्रेक थांबवलेला आहे आहे. गायकवाड आयोगाला गावोगावी जाऊन वस्तुस्थिती दाखविली, असे असतानाही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या काळात हा निकाल देऊन नेमके काय साधले, असाही सवाल मराठा समाजातील मान्यवरांनी पोलीस दलाच्या बैठकीत उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांची बैठक घेतली. त्या बैठकीत प्रत्येकाने आपले मत मांडले.
प्रा. डी. डी. बच्छाव यांनी सांगितले की, गायकवाड समिती जळगाव जिल्ह्यात आली तेव्हा आपण स्वतः चाळीसगाव चोपडा, पाचोरा या भागात फिरलो. कोरडवाहू व बागायती शेती व शेतकऱ्यांचे घर त्यांना दाखविले. वस्तुस्थिती समजल्यानंतर आयोगाने अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला, असे असताना असा निकाल येणे अत्यंत दुःख व वेदनादायी आहे.
डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, भारतातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे पोलिस व सरकारी यंत्रणेवर मोठा ताण आहे, असे असताना याच काळात मराठा आरक्षणाचा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय साधले आहे याचे आश्चर्य वाटते. हा निकाल सहा महिने उशिरा नाही देता आला असता.
विनोद देशमुख यांनी प्रत्येक वेळी मराठा समाजच समजूतदाराची भूमिका घेतो. या निकालामुळे जगायचे की समजूतदारपणा दाखवायचा हेच कळत नाही. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे, त्यामुळे हे प्रकार आधी थांबवावे. त्यांनी राजकीय पोळी भाजून घेऊ नये.
कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवा : पोलीस अधीक्षक
या बैठकीत मराठा समाजातील मान्यवरांची मते जाणून घेतल्यानंतर पोलीस अध्यक्ष डॉ. प्रवीण मुंढे यांनी आपल्या प्रत्येकाच्या भावना राज्यशासनाकडे कळवल्या जातील. या निकालामुळे कुठेही कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागू नये. तरुण पिढी भावनेच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलू शकते, त्यासाठी आपणच पुढाकार घेऊन चांगले काय, वाईट काय, याची जाणीव करून द्यावी. शेवटी पोलीस दलाला कायदा राबवावा लागतो असे मत व्यक्त करून शांततेचे आवाहन केले.
या बैठकीला संजय पवार, रवी देशमुख, हेमंत साळुंके, सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, ॲड.सचिन पाटील, दीपक सूर्यवंशी, प्रमोद पाटील, किरण बच्छाव, हिरेश कदम यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा व सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
आज समाजाची बैठक
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी सात वाजता नूतन मराठा महाविद्यालयात समाजातील सर्वपक्षीय मान्यवरांची बैठक बोलावण्यात आली आहे. या निकालात राज्य शासनाने तोडगा काढावा व पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावे, असे मत मांडण्यात आले.