१२ वीच्या विद्यार्थ्यांनो... परीक्षा देताना कॉपीचा विचारही करू नका, केंद्रांवर असणार ड्रोनचा वॉच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:19 IST2025-02-10T15:18:31+5:302025-02-10T15:19:03+5:30
परीक्षा काळात ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत, या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदाराला सहआरोपी करण्याचे निर्देश दिले आहेत.

१२ वीच्या विद्यार्थ्यांनो... परीक्षा देताना कॉपीचा विचारही करू नका, केंद्रांवर असणार ड्रोनचा वॉच!
जळगाव : राज्यात उद्या ११ फेब्रुवारी रोजी बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्हाभरातून ८१ केंद्रांतून ४७ हजार ६६७ विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी जळगाव जिल्ह्यात सात भरारी पथके नियुक्त केली आहेत. प्रत्येक तालुकास्तरावरील अनेक केंद्रांवर बैठे पथक नियुक्त केले आहे.
गेल्या पाच वर्षात गैरप्रकार आढळून आले आहेत, अशा ४० केंद्रांवर केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदली करण्यात आली आहे. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४७ हजार ६६७विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. त्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे.
केंद्र संचालकांचीही होणार तपासणी
परीक्षा काळात ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत, या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदाराला सहआरोपी करण्याचे निर्देश दिले आहेत. गोंधळ होणार नाही याबाबत पोलिस प्रशासनाला सुचना दिल्या आहेत.
संवेदनशील परीक्षा केंद्रांच्या परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे निगराणी करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ७ भरारी पथके व बैठे पथक नियुक्त केली आहेत. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची फेशियल रेकग्निशन सिस्टीमव्दारे तपासणी करण्यात येणार आहे. विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. प्रत्यक्ष गैरप्रकार करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे.