HSC Result: प्रेरणादायी 'राहिल'... अधंत्वावर मात करुन 12 वीच्या परीक्षेत मिळवलं डोळस यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 01:36 PM2022-06-09T13:36:23+5:302022-06-09T13:37:15+5:30
राहिलनने इंग्रजी माध्यमातून 68 टक्के गुण मिळवत 12 वीच्या परिक्षेत यश संपादन केले.
जळगाव - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये, अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी परिस्थितीशी झगडत यश संपादन केले आहे. त्यात, कोरोना काळात पालकांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तर, दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या जळगावच्या राहिलने बारावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलं आहे. शिकण्याची जिद्द मनी ठेऊन त्याने प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास केला. अखेर, त्याच्या मेहनतीला फळ मिळालं.
राहिलनने इंग्रजी माध्यमातून 68 टक्के गुण मिळवत 12 वीच्या परिक्षेत यश संपादन केले. राहीलचं यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. कारण, नशिबाने दिलेल्या अंधत्वावर त्याने डोळसपणे मात करुन हे यश मिळवलं आहे. राहील हा जळगावातील अक्सा नगरमध्ये राहणारे डॉ. मुनाफ व रेहाना शेख यांचा मुलगा. दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही तो बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. मुलाला जन्मतःच दृष्टी नसल्याचं दुःख त्याच्या आई-वडिलांनी मानलं नाही, इतर मुलांप्रमाणे त्याला शिकवायचं... मोठं करायचं... स्वतःच्या पायावर उभं करायचं स्वप्न शेख दाम्पत्याने पाहिलं
आई-वडिलांनी पाहिलेलं स्वप्न आणि दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याची किमया राहिलंनं करुन दाखवली. या प्रवासातील पहिला टप्पा पूर्ण केल्यामुळं शेख कुटुंब आनंदाचे वातावरण आहे. आई-वडिलांनी मोठ्या आनंदात आपल्या लाडक्या लेकाला पेढा भरवून हा क्षण साजरा केला आहे. राहील जन्मतःच अंध आहे, त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी शेख यांनी खूप प्रयत्न केले, पण दुर्दैवाने त्यात यश आलं नाही. शेवटी मुलाला त्याच्या पायावर उभं करायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी राहीलच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं.
फॉरेन लँग्वज करुन करिअरची इच्छा
राहील हा कला शाखेच्या इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी आहे. कोरोनात त्याने ऑनलाइन शिक्षण घेतलं. कॉलेज सुरू झाल्यावर ऑफलाइन शिक्षणासाठी नियमित वर्गात गेला. रायटरच्या मदतीने त्याने बारावीची परीक्षा दिली. राहिलला ब्रेल लिपी अवगत आहे, पुढं फॉरेन लॅंग्वेज शिकून त्याला करिअर करायच त्याचं स्वप्न आहे.