होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:07 PM2018-08-17T23:07:50+5:302018-08-17T23:08:37+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये साहित्यिक डॉ.उल्हास कडूसकर सध्या ‘रंग प्रेमाचे’ या सदरात संवादात्मक लिहित आहेत.

Hucker | होकार

होकार

Next

राजेश : राधिका, आता खूप दिवस झाले. मला एकदा नक्की सांगून टाक, तू मला होकार देणार आहेस की नाही?
राधिका : बघू, नंतर बघू, मी अजून काही ठरवलं नाही.
राजेश : अग मग केव्हा देणार आहेस उत्तर ? इतक्यात नाही तर केव्हा?
राधिका : कसली एवढी घाई झालीय रे तुला?
राजेश : मला नोकरी लागली, तुझं शिक्षण संपलं, हो ऽ ऽ ऽ म्हणून मला आता घाई आहे.
राधिका : हो का?
राजेश : हो का नको? पक्का होकार पाहिजे.
राधिका : असं घाईघाईत नाही सांगता येत बाई... अरे चल ते पहा तिकडे मस्त पाणीपुरीचा ठेला आहे. चल, चल लवकर.
राजेश : छे..! असं रस्त्यावर उभं राहून खायला मला नाही आवडतं.
राधिका : मला आवडतं. चल, चल, मला भूक लागलीय खूप.
राजेश : त्यातून तू भुरके मारून आवाज काढत खाणार...
राधिका : अरे वेड्या, पाणीपुरी अशीच खायची असते. इथे तर गार्डन आहे. सगळेच जण असंच खायला मुद्दाम येतात. गावात ठिक आहे. तिथे चौकात मी गाडीपाशी थांबले पाणी पुरीच्या की तू माझ्यापासून सहा फूट लांब उभा रहातोस.
राजेश : बरं बाई चल !
राधिका : आता कोल्ड पाहिजे हं कोल्ड !
राजेश : अग थंड वारे आहे आणि कोल्ड्रींक कसलं पितेय?
राधिका : अरे उलट अशा हवेतच आईस्क्रीम खायचं, कोल्ड कॉफी घ्यायची हॉटेल असतं तर तेच घेतलं असतं.
राजेश : घे बाई तुला हवं ते !
राधिका : हा नुसतं हो नाही दोघांनी एकाच बाटलीतून स्ट्रॉ घालून प्यायचं !
राजेश : वा ग वा ! सगळे पहातायत - काय म्हणतील ते ?
राधिका : काही का म्हणेनात..?
राजेश- तर तू हो केव्हा म्हणणार ? सांग बरं पटकन् !
राधिका : ते नंतर ! नंतर ! चल, चल ! हा बघ काय मस्त पाऊस पडायला लागलाय. चल, चल ! छानपैकी भिजू या।
राजेश : अग, आपण आता काय लहान मुलं आहोत का? पावसात भिजायला? गारा वेचायला !
राधिका : तू नसशील ! पण मी लहानच आहे अजून ! घरी आम्हाला गच्चीवरदेखील जाऊ देत नाहीत.
राजेश : अग, नको, उगीच सर्दी होईल- ताप, थंडी पडसं, खोकला.
राधिका : काही होत नाही आणि झाला तर बघू !
राजेश : नको अग, उगीच अंग भिजून जाईल. आणि... आणि ओल्या अंगाचे घट्ट झालेले कपडे... म्हणजे... म्हणजे..सगळे बघत राहतील !
राधिका : अस्स ! ये बात है ! बरं ! मी पदर असा चांगला घट्ट लपेटून घेईन मग तर झालं ?
राजेश : तू काही ऐकणार नाहीस! बरं आता तरी ‘हो’ म्हणतेस का?
राधिका : ते राहू दे ! काय रे माझ्या वाढदिवसाला कपडे आणायला तू रेखाबरोबर गेलास आणि काय म्हणालास ... हा ड्रेस राधाला खूप घट्ट होईल !
राजेश : तेव्हा रेखा केवढी रागावली?
राधिका : मग, बरोबरच आहे, मुलींच्या मापांची अशी चर्चा करतात काय? दुकानात? वेडपट कुठला.
राजेश : काय गं राधा? पिक्चरमधून आपण अर्ध्यावर उठून आलो तिथे तू मला अगदी बाजूला ढकलत होतीस आणि मोटारसायकलवरून येताना मात्र लिपटत होतीस....आॅ?
राधिका : अरे थिएटरमध्ये अंधार होता, इथे चक्क उजेड होता आणि सारखे लागणारे स्पीडब्रेकर, त्याच्यामुळे ...एवढं पण कळत नाही ना? बावळटच आहेस !
राजेश : आता तरी हो म्हणार आहेस का?
राधिका : गाणं, गाणं राहील ! मी आता गाणं म्हणणार आहे. तू म्हणणार? तुला कुठलं आवडतं?
राजेश : हरे रामा हरे कृष्णा.
राधिका : बरोबर आहे, झिंगून म्हणण्याचं गाण आवडणारच तुला।
राजेश : आणि तुला ?
राधिका : यह जिंदगी उसीकी है जो किसीका हो गया....!
राजेश : ग्रेट.. ग्रेट ! अग हे काय? पडलो ना मी। जरा लक्ष दे ! पायात पाय अडकून, पळू नकोस अशी
राधिका : मी काही मुद्दाम नाही केलं तुला ठेच लागली असेल सोड मला? किती वेळ धरून ठेवणार आहेस!
राजेश : मी रुसलो तर तू काय करशील ?
राधिका : गालगुंच्या घेईन तुझा ! आणि मी रुसले तर...
राजेश : तर काय?
राधिका - तू माझी पप्पी घ्यायची! ह: ह:
राजेश : आता तरी सांग, तुझं उत्तर !
राधिका : तुला अजून नाही कळलं? असे इथे घरापासून लांब अशा वेळी अशा मौसममध्ये, जास्त वर्दळ नसताना तुझ्याबरोबर आले आहे ते काय माझं प्रेम असल्याशिवाय का रे?
-डॉ.उल्हास कडूसकर, जळगाव

Web Title: Hucker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.