पावसाळ्यातील पाणीटंचाईमुळे धरणगावात प्रचंड असंतोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:11+5:302021-08-29T04:18:11+5:30

नगरपालिका प्रशासनातील कारभारींच्या कामकाजाचा फटका धरणगावकरांना बसत आहे. नियोजन नसल्यामुळे भर पावसाळ्यात धरणगावकरांना उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती अनुभवावी लागत आहे. ...

Huge dissatisfaction in dam due to water shortage in monsoon! | पावसाळ्यातील पाणीटंचाईमुळे धरणगावात प्रचंड असंतोष!

पावसाळ्यातील पाणीटंचाईमुळे धरणगावात प्रचंड असंतोष!

Next

नगरपालिका प्रशासनातील कारभारींच्या कामकाजाचा फटका धरणगावकरांना बसत आहे. नियोजन नसल्यामुळे भर पावसाळ्यात धरणगावकरांना उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती अनुभवावी लागत आहे. त्यामुळे गुरुवारी संतप्त महिलांनी नगरपालिकेवर धडक देत नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. अगदी पालिकेला बांगड्यांचा अहेर देण्यात आला.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे सोशल मीडियात विशेषतः विविध व्हाॅटसॲप ग्रुपवर याबाबत नगरपालिका प्रशासनाला जाब विचारले जात आहेत. व्हाॅटसॲप ग्रुपवर राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहेत. विस्कळीत तसेच दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे. काही नागरिकांनी ‘सात दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर राजीनामा देईन,’ ही जुनी बातमी काही दिवसांपूर्वी शेअर करून नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांना जाब विचारला होता. एवढेच नव्हेतर, त्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली होती.

भर पावसाळ्यातील पाणीटंचाईमुळे धरणगावच्या सोशल मीडियात प्रचंड असंतोषाचे वातावरण बघावयास मिळत आहे. वीस ते पंचवीस वर्षांपासून धरणगाव नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही पाण्याचा प्रश्न का सुटत नाही, असा उघड प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तरीदेखील धरणगावचा पाणी प्रश्न का सुटत नाही, असा प्रश्न विचारून विरोधकही शिवसेनेवर हल्लाबोल करीत आहेत.

दरम्यान, नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या आपसातील राजकारणामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जात नाही, अशीदेखील गावात चर्चा आहे. पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना अवैध नळकनेक्शनकडेदेखील मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे.

लसीकरणाबाबतही नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुणांमध्ये नंबर लावण्यावरून जोरदार हाणामारी झाली होती. त्यामुळे गावात दोन ते तीन लसीकरण केंद्रे उभारण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

लस उपलब्ध झाल्यावर नागरिक पहाटे तीन ते चार वाजेपासून लसीकरण केंद्रावर रांगा लावत असतात. वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनदेखील याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

- कल्पेश महाजन

Web Title: Huge dissatisfaction in dam due to water shortage in monsoon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.