किराणा दुकान, भाजी विक्रेत्यांकडून प्रचंड लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:22 PM2020-03-27T12:22:59+5:302020-03-27T12:24:54+5:30
बटाटे ५०, मिरची ८० रुपये किलोवर, सोयाबीन तेल १२० रुपयांवर
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉक डाऊनच्या काळात जीवनानश्यक वस्तूंची विक्री सुरू असली तरी किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते यांच्याकडून किराणा माल व भाजीपाला अव्वाच्या सव्वा भावात विक्री केला जात आहे. २० ते २५ रुपये किलो असणारे बटाटे आता थेट ५० रुपये तर हिरवी मिरची ८० रुपये किलोने तर सोयाबीन तेलदेखील १२० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट होत असली तरी प्रशासन याकडे लक्ष देणार आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जगासह देशभरात कोरोनामुळे हाहाकार पसरल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यासह लॉक आऊट जाहीर करण्यात आले. त्यानंतर पुन्हा देशभरात २१ दिवसांचा लॉक आऊट जाहीर झाला. मात्र या लॉक आऊटमध्ये जीवनावश्यक वस्तू असलेला किराणा माल, अन्नधान्य, भाजीपाला, गॅस सिलिंडर, दूध इत्यादी वस्तूंची विक्री सुरू राहणार असल्याचे राज्य व केंद्र सरकारनेही जाहीर केले.
मात्र या संचारबंदी व लॉक आऊटमुळे नागरिक धास्तावून गेले व किराणा माल, अन्नधान्य, भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागले. याचा फायदा विक्रेत्यांकडून घेतला जात असून सर्वच वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहे.
भाजापाल्याचे भाव दुप्पट
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उपलब्ध आहे व रोज त्याची आवकही होत आहे. मात्र भाजीपाला विक्रेत्यांकडून भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहे. यामध्ये लॉक आऊटपूर्वी २० ते २५ रुपये प्रती किलो असणारे बटाटे आता थेट ५० रुपये प्रती किलोने विक्री केले जात आहे. तसेच ३० रुपये प्रती किलो असणारी हिरवी मिरची थेट ८० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहकांच्या डोळ््यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे भाव थोडेफार नियंत्रणात येऊन २५ ते ३० रुपये प्रती किलोवर आले असताना आता पुन्हा या संचारबंदी व लॉक आऊटचा फायदा घेत कांदे ४५ ते ५० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. यात लहान व हलक्या दर्जाचा कांदाही ३० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. अशाच प्रकारे कोथिंबीर १०० रुपये प्रती, फूल कोबी व पत्ता कोबी ५० ते ६० रुपये, वांगे ५० ते ६० रुपये किलोने विक्री होत आहे. इतरही सर्वच भाजीपाल्याचे भाव असेच वाढविले आहे.
सोयाबीन तेलात २५ ते ३० रुपयांनी वाढ
लॉक डाऊनच्या काळात नागरिक किराणा मालाचाही साठा करीत असल्याने मागणी वाढताच त्यांचे भाव दुकानदारांनी वाढविले आहे. यामध्ये ९० ते ९५ रुपये प्रती किलो असलेले सोयाबीन तेल आता थेट १२० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. विशेष म्हणजे सोयाबीन तेलाचाच सर्वाधिक वापर असल्याने व आताही त्याला मोठी मागणी असल्याने या तेलाचे भाव प्रचंड वाढविण्यात आले आहे. काही दुकानांवर हे तेल १०५ रुपये तर काही ठिकाणी ११०, १२० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. या सोबतच शेंगदाण्याचे भावही १२० रुपयांवर पोहचले असून आवक जास्त असल्याने कमी झालेल्या साखरेचे दरही पुन्हा वाढले आहे. ऐन गुढीपाडव्यापूर्वी ३७ रुपयांवर आलेली साखर आता ४० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. पोह्याचे भावदेखील ४० ते ४२ रुपये प्रती किलोवर पोहचले आहे.
पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाºयाकडे कानाडोळा
संचारबंदी व लॉक डाऊनच्या काळात कोणी जादा दराने विक्री केली, साठवणूक अथवा काळा बाजार केला तर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. मात्र तरीदेखील विक्रेते या इशाºयाला जुमानत नसून जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावानेच विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिकांची ही लूट रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी, अशी मागणी केली जात आहे.
किराणा दुकान असो की भाजीपाला विक्री असो या प्रत्येक ठिकाणी सर्वच वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले असून ग्राहकांची अक्षरश: लूट केली जात आहे.
- गोपाल चौधरी, ग्राहक.
कमी झालेल्या सोयाबीन तेलाचे भाव अचानक वाढविण्यात आले असून ते थेट १२० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. इतरही किराणा मालाचा भाव वाढविला असून भाजीपालाही आवाक्याच्या बाहेर जात आहे.
- दत्तात्रय सोनवणे, ग्राहक.