हास्य कवितांची बहारदार मेजवाणी : पावसाळी वातावरणात बरसणार ‘हास्य धारा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 11:52 AM2019-06-30T11:52:01+5:302019-06-30T11:53:06+5:30
व.वा. वाचनालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन
जळगाव : व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे ३० जूूून रोजी सायंकाळी ६.३० वाजता कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या बहारदार कार्यक्रमाद्वारे रसिकांना एकाहून एक सरस हास्य कविता ऐकण्याची संधी उपलब्ध होणार असून पावसाळी वातावरणात एक प्रकारे नामवंत कवींच्या हास्य धाराच या वेळी बरसणार आहेत.
शतकोत्तर व.वा. वाचनालयाचा वर्धापन दिन दरवर्षी वेगवेगळ््या कार्यक्रमांची मेजवाणी घेऊन येतो. त्यानुसार यंदाचा वर्धापन दिन पावसाळी वातावरणात पाऊस धारांसह ‘हास्य धारा’ घेऊन आला आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आपल्या विडंबन काव्याने मराठी रसिकांना भूरळ घालणारे रामदास फुटाणे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. ‘भारत कधी कधी माझा देश आहे....’ अशा काव्य पंक्तींनी आकर्षित करणारे, विविध हास्य कविता संग्रहासह चित्रपट कथालेखक, दिग्दर्शक अशा चतु:रस्त्र व्यक्तीमत्त्वाला अनुभवण्याची संधी ‘हास्य धारा’ने जळगावकर रसिकांना उपलब्ध करून दिली आहे.
या सोबतच दीर्घ काव्य संग्रहकार तसेच नाट्यलेखक, कवी अनिल दीक्षित (पुणे), ललित लेखक, कवी साहेबराव ठाणगे (अहमदनगर), ज्यांच्या कविता दूरचित्रवाणीवरून राज्यभरात पोहचलेल्या असे कवी भरत दौडकर (शिक्रापूर), चित्रपट गीतकार, गझलकार, कवी नितीन देशमुख (चांदूरबाजार) आणि कवी नारायण पुरी (तुळजापूर) हे कविता सादर करणार आहेत.
अशा नामवंत कवींच्या कविता ऐकण्याचा हा कार्यक्रम विनामूल्य असून वाचनालयाचे सभासद वाचक, साहित्यप्रेमी रसिकांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाने केले आहे.