आवक घटल्याने कोथिंबीरची शंभरी, कांद्याचा काहीसा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:07 AM2021-08-02T04:07:41+5:302021-08-02T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होत असून त्यांचे भाव चांगलेच वाढत आहे. यामध्ये कोथिंबीरने तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होत असून त्यांचे भाव चांगलेच वाढत आहे. यामध्ये कोथिंबीरने तर शंभरी गाठली असून मेथीदेखील ८० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. किराणा साहित्यामध्ये शेंगदाण्याचे भाव १० रुपये प्रति किलोने वाढून ते १२० ते १३० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. इतर किराणा साहित्य मात्र स्थिर आहे.
जून महिन्यात गायब असलेला पाऊस जुलै महिन्यात चांगला सक्रिय झाल्याने खरीप पिकांना त्याचा लाभ होत आहे. मात्र भाजीपाल्याच्या शेतात चांगलीच कसरत होत आहे. त्यामुळे मराठवाडा भागातून येणाऱ्या भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम झाला आहे. यात कोथिंबीर, मेथी यांच्यावर अधिक परिणाम आहे. पावसापूर्वी २० क्विंटल आवक असलेल्या कोथिंबीरची आवक आता १० ते १२ क्विंटलवर आली आहे. त्यामुळे सलग दोन आठवड्यापासून त्याचे भाव वाढत आहे. गेल्या आठवड्यात ८० रुपयांवर असलेले कोथिंबीरचे भाव सध्या १०० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे मेथीदेखील ८० रुपये प्रति किलो झाली आहे.
डाळींचा दिलासा, शेंगदाण्यात वाढ
या आठवड्यात डाळींचे भाव स्थिर असून शेंगदाण्याचे भाव मात्र वधारले आहेत. यामध्ये तूरडाळ ९० ते ९४ रुपये, मूगडाळ-८५ ते ९० रुपये, उडीदडाळ- ८५ ते ९० रुपये, हरभरा डाळ-६२ ते ६६ रुपये, मसूर डाळ - ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर आहे. शेंगदाण्याचे भाव १२० ते १३० रुपये प्रति किलो झाले आहेत. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत.
फुलकोबीचे भाव दुप्पट
पालेभाज्यांसह इतरही भाजीपाल्याचे भाव वाढत आहे. यामध्ये फुलकोबीचे तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत थेट दुप्पट भाव झाले आहेत. २० रुपयांवर असलेली फुलकोबी आता थेट ४० रुपये प्रति किलो झाली आहे.
हिरवी मिरचीचा दिलासा
इतर भाजीपाल्याच्या भावात वाढत होत असताना हिरव्या मिरचीचे भाव कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात ६० रुपये प्रति किलो असलेली मिरची ४० रुपये प्रति किलोवर आली आहेत. कांद्याचेही भाव ३० रुपयांवर २५ रुपये प्रति किलोवर आले आहेत.
दर आठवड्याला महागाई वाढतच आहे. कधी किराणा साहित्य तर कधी भाजीपाला वधारत आहे. त्यामुळे आर्थिक भार वाढतच आहे. महागाई कमी होणे गरजेचे आहे.
- योगेश भावसार, ग्राहक
या आठवड्यात शेंगदाण्याच्या भावात काहीसी वाढ झाली आहे. मात्र सध्या डाळींचे तसेच इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. मागणी कमी असल्याने भाववाढ फारसी होत नाही.
- रमेश वाणी, व्यापारी.
सध्या भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम झाल्याने त्याचे भाव वाढत आहे. यामध्ये कोथिंबीर व मेथीच्या भावात अधिक वाढ झाली आहे. कांद्याचे भाव काहीसे कमी झाले आहेत.
- सूरज चौधरी, भाजीपाला विक्रेते