MBA चं उच्च शिक्षण अन् घरची श्रीमंती विसरुन भाविकांच्या सेवेत करतात जेवण, धुणीभांडी

By अमित महाबळ | Published: October 16, 2022 03:39 PM2022-10-16T15:39:14+5:302022-10-16T15:40:09+5:30

दररोज किमान पाच हजारांपेक्षा अधिक भाविकांचा नास्ता, दोन्ही वेळचे जेवण अखंड भंडारा साहबमध्ये बनत आहे

Hundreds of sisters in the service of devotees, forgetting the wealth of the house, higher education | MBA चं उच्च शिक्षण अन् घरची श्रीमंती विसरुन भाविकांच्या सेवेत करतात जेवण, धुणीभांडी

MBA चं उच्च शिक्षण अन् घरची श्रीमंती विसरुन भाविकांच्या सेवेत करतात जेवण, धुणीभांडी

Next

जळगाव : वर्सी महोत्सवात देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी अखंड भंडारा चालविला जात असून, त्यांच्यासाठी जिलेबी, मूग हलवा, व्हेज बिर्याणीसह विविध पदार्थांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे घरी दिमतीला नोकरचाकर, दाराशी चारचाकी आहेत. मोठमोठी व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत, मात्र हे सगळे बाजूला सारून अशा घरांतील शंभरावर महिला आणि तरुणी अखंड भंडारा साहबमध्ये अविरत सेवा देत आहेत. भाज्या चिरण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत प्रत्येक काम त्या सेवा म्हणून करत आहेत.

दररोज किमान पाच हजारांपेक्षा अधिक भाविकांचा नास्ता, दोन्ही वेळचे जेवण अखंड भंडारा साहबमध्ये बनत आहे. कोणी केव्हाही आला, तरी तो उपाशी राहणार नाही. किमान दूध तरी त्याला मिळेल याची काळजी घेण्यात येत आहे. या विभागाची जबाबदारी राजकुमार प्रथ्यानी यांच्यावर आहे. १५ वर्षांपासून ते वर्सी महोत्सवातील अखंड भंडारा साहब सांभाळतात. हा विभाग नेहमीच तत्पर असतो. सकाळी ६ वाजेपासून त्यांचे काम सुरू होते. पहाटेच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून भाजी, फळे यांची खरेदी केली जाते. दररोज ताजे पदार्थ बनतात. भाविकांना ताटात उष्टे अन्न टाकू दिले जात नाही. वारंवार घ्या पण टाकू नका, अशी विनंती भाविकांना केली जाते.

अखंड भंडाऱ्यामध्ये काम करण्यासाठी कामाचा प्रचंड उरक असावा लागतो. कारण, इथे जराही उसंत मिळत नाही. स्वयंपाक करण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत जे काम वाट्याला येईल ते करावे लागते. असे असले तरी उच्चशिक्षित तरुणीही मोठ्या उत्साहाने काम करताना दिसतात. प्रियंका कोरानी यांचे एमबीए (एचआर) झाले असून, त्यांच्या वडिलांचे जळगाव शहरात नामांकित दुकान आहे. त्या स्वत:ही नोकरी करतात. गेल्या अनेक वर्षांपासून वर्सी महोत्सवात व इतर वेळी सेवा देतात. सेवा मंडळातील वातावरणामुळे सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी सांगितले. 

नॅन्सी गोविंदनानी यांचे बीबीए झाले असून, खासगी शाळेत गणित शिकवतात. त्या चार वर्षांपासून वर्सीमध्ये सेवा देत आहेत. भंडारा साहबमध्ये नवीन पदार्थ शिकायला मिळत असल्याचा त्यांना आनंद आहे. काकांना व्यवसायात मदत करतात. या दोघी वृद्धाश्रमातही सेवा देतात. मीरा खानचंदानी २० वर्षांपासून सेवा देत आहेत. त्यांनी संत बाबा हरदासराम साहब (गोधडीवाला) व संत बाबा गेलाराम साहब यांना प्रत्यक्ष पाहिले आहे.
 

Web Title: Hundreds of sisters in the service of devotees, forgetting the wealth of the house, higher education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.