जागतिक पोपटदिनी शेकडो पोपटांवर काळाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST2021-06-02T04:13:31+5:302021-06-02T04:13:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जागतिक कासवदिनी असोदा येथे पाइपलाइनमध्ये अडकून उष्णतेमुळे शेकडो कासवांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, ...

जागतिक पोपटदिनी शेकडो पोपटांवर काळाचा घाला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जागतिक कासवदिनी असोदा येथे पाइपलाइनमध्ये अडकून उष्णतेमुळे शेकडो कासवांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, सोमवारी जागतिक पोपटदिनीच म्हसावद परिसरातील बोरणार येथे झालेल्या वादळी पावसासह गारपिटीमध्ये शेकडो पोपटांसह गायबगळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. बोरणार ग्रामस्थ व वन्यजीव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राबवलेल्या बचाव कार्यात काही पोपटांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
३१ मे, जागतिक पोपट दिवसाची रात्र म्हसावदजवळील बोरणार परिसरातील पक्ष्यांसाठी काळ रात्र बनून आली. म्हसावद, बोरणार परिसरात सोमवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळी पाऊस व गारपिटीमध्ये गिरणा नदीच्या काठावरील झाडावर रात्री निवारा असलेल्या पोपट आणि गायबगळ्यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. सोसाट्याचा वारा व तुफान पावसामुळे कडुनिंबाच्या झाडावर रात्री निवारा म्हणून बसलेल्या शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. १५०हून अधिक पोपट, तर ५०हून अधिक गायबगळ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पाऊस पडावा तसे झाडावरून पडले पक्षी
सोसाट्याचा वारा व जोरदार पावसामुळे पाऊस पडावा तसे पक्षी झाडावरून पडू लागले. सुमारे २०० हून अधिक पोपट आणि बगळे मृत्युमुखी पडले. काही पक्षी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तसेच किमान दीडशे ते दोनशे पोपट आणि बगळे जखमी झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोपटांचा अधिवास आहे. मात्र, अनपेक्षितपणे आलेल्या वादळी पावसामुळे पक्ष्यांचे मृत्यू झाले आहेत.
ग्रामस्थांनी केले बचाव कार्य; ४३ पोपटांना मिळाले जीवदान
याबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले. अनेक पक्षी नागरिकांच्या हाताला चावा घेत होते. मात्र, तरीदेखील प्रमोद बडगुजर आणि सहकाऱ्यांनी तातडीने जखमी पोपटांना जमा करत त्यांना नदी काठीच सुरक्षित स्थळी हलविले व टोपली खाली झाकले. दरम्यान, गावकऱ्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क साधत बचावकार्य सुरू ठेवले. वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, योगेश गालफाडे, उद्योजक समीर साने, बाळकृष्ण देवरे यांनी बचावकार्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य प्रथमोपचार पेटी, घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नदीकाठी जाऊन परिसराची पाहणी केली. परिस्थिती बघता चार पोपट किरकोळ जखमी आणि इतर पोपट हे सुस्थितीत मात्र भेदरलेल्या अवस्थेत आढळून आले. सुमारे तासभर बचावकार्य करून गावकरी आणि संस्थेची टीम मुख्य रस्त्यावर आली. दरम्यान, वनविभागाचे वाहन घेऊन वनरक्षक आणि कर्मचारी गावात दाखल झाले. पोपटांची पाहणी करून सगळे पक्षी वनविभागाने ताब्यात घेतले. उपवनसंरक्षक विवेक होशिंग हे रात्रीपासूनच माहिती घेत होते. त्यांनी सकाळीच लांडोरखोरी येथे येऊन पक्ष्यांची पाहणी केली.
कोट..
गावकऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेने ४३ पक्ष्यांचा जीव वाचला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेंद्र चोपडे यांनी पक्ष्यांची वैद्यकीय तपासणी केली. चार पोपटवगळता सगळे सुस्थितीत आहेत.
- रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक
अचानक झालेल्या वादळ आणि गारपिटीने पक्ष्यांना सावरण्याची संधी मिळाली नाही. अंधार असल्यानेदेखील पक्षी सैरभैर झाले आणि खाली पडले.
- बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था.