आसोदा येथे जलवाहिनी टाकताना शेकडो कासवांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:30+5:302021-05-24T04:15:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बळीराजा योजनेंतर्गत जलवाहिनीसाठी नाला वळविल्यानंतर त्यातील कासव जलवाहिनीत येऊन शेकडो कासवे मृत्यूमुखी ...

Hundreds of turtles die while laying aqueduct at Asoda | आसोदा येथे जलवाहिनी टाकताना शेकडो कासवांचा मृत्यू

आसोदा येथे जलवाहिनी टाकताना शेकडो कासवांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बळीराजा योजनेंतर्गत जलवाहिनीसाठी नाला वळविल्यानंतर त्यातील कासव जलवाहिनीत येऊन शेकडो कासवे मृत्यूमुखी पडल्याची घटना आसोदा येथे घडली. मृत कासवांचा जलवाहिनीखाली खच पडला आहे. कासवांचा मृत्यू झाला तरी या कामादरम्यान त्यांना जमिनीत गाडले जात असून, या असंवेदनशीलतेबद्दल पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जागतिक कासव दिनाच्या पूर्वसंध्येला शेकडो कासवांचा बळी गेला असला, तरी याविषयी वन विभागाला रविवारी जाग आली व त्यानंतर पंचनामा करण्यात आला.

वाघूर धरणातून शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या बळीराजा योजनेतून जळगाव तालुक्यात काम सुरू आहे. यामध्ये असोदा शिवारात लवकी नाल्याला वळण करून ममुराबादकडे मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ज्या लवकी नाल्याजवळ हे काम सुरू आहे, त्या लवकी नाल्यामध्ये खेकडा, कासव असे बरेच जलचर प्राणी आहेत.

उष्णतेमुळे कासवांचा मृत्यू

जलवाहिनीचे काम करत असताना ठेकेदाराने नाल्याला वळवले. त्यानंतर नाल्यातील कासवे जलवाहिनीत आली. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड असल्याने जलवाहिनी तापली तसेच याठिकाणी वेल्डिंग करत असताना उष्णतेत अधिकच भर पडली व जलवाहिनीमध्ये कासवे मृत्यूमुखी पडली. हे काम करताना कासवांना पुन्हा नाल्यामध्ये न पाठविल्याने त्यांचा उष्णतेने मृत्यू झाला.

दुर्गंधी पसरली तरीही दुर्लक्ष

लवकी नाल्याजवळ मृत्यूमुखी पडलेल्या कासवांची संख्या १५० ते २००च्या जवळपास असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. या कासवांच्या मृत्यूमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे याठिकाणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी असतात. तसेच वरिष्ठ अधिकारीही येत असतात. मात्र, याकडे सर्वांनीच कानाडोळा केला आहे.

इंडियन फ्लॅपशेल जातीचे कासव

रविवारी वन विभागाच्यावतीने मृत कासवांचा घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. त्याठिकाणी ४८ मृत कासो आढळल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. इंडियन फ्लॅपशेल जातीचे हे कासव असून, मृत कासवांना जाळून नष्ट केले जाणार आहे. नाल्यातून बाहेर आल्याने व उन्हाच्या तीव्रतेने कासवांचा मृत्यू झाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.

याविषयी उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी या संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर ‘लोकमत’चे खिर्डी येथील प्रतिनिधींकडून वन विभागाच्या पथकाने माहिती घेत घटनास्थळ गाठले व पंचनामा केला.

ग्रामस्तरावरील जैवविविधता समित्या कागदोपत्री

शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक गावात जैवविविधता समिती स्थापन करणे बंधनकारक असून, परिसरात, गावात काही घटना घडल्यास घटनास्थळी भेट देऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविणे गरजेचे आहे. मात्र, ग्रामस्तरावर जैवविविधता समित्या फक्त कागदोपत्री असल्याचा आरोप केला जात आहे.

बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेत उल्लेख

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे असोदा हे माहेर असून, त्यांच्या ‘माझ्या माहेराची वाट’ या कवितेत वर्णन असलेला हा लवकी नाला आहे. तेथे दुर्मीळ अशी काळे कासवे आढळतात. या कासवांना कोणी मारत नाही, घरीही नेत नाही. धार्मिकदृष्ट्या त्यांचे महत्त्व आहे, असे या गावातील रहिवासी मानतात.

याविषयीची अधिक माहिती घेण्यासाठी हे काम करणाऱ्या ठेकेदारांशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल सतत बंद येत होता.

----------------

या प्रकाराला अजूनही गांभीर्याने घेतले गेलेले नाही. मृत कासवे तशीच ठेवून ठेकेदाराने असंवेदनशीलता दाखवली आहे. वास्तविक हा अपघात नसून, हत्या आहे. त्या कासवांना पुन्हा नाल्यात पाठवता आले असते. पण कोणी काहीच केले नाही. दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी.

- किशोर चौधरी, अध्यक्ष, नवनिर्मिती शेतकरी मंडळ, असोदा, ता. जळगाव

आसोदा येथे घडलेल्या कासवांच्या मृत्यूबाबत कोणतीही माहिती नाही. वन विभागाच्या क्षेत्रात असा कोणताही प्रकार घडलेला नाही.

- विवेक होशिंग, उपवनसंरक्षक

आसोदा येथील कासवांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असून, कासवांच्या संवर्धनासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. जलवाहिनीमध्ये आणखी काही कासवे राहिली असतील तर त्यांचा वन्यजीव संरक्षण समितीकडून शोध घेऊन त्यांना पुन्हा पाण्यात सोडले जाईल.

- रवींद्र फालक, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण समिती

आंतराष्ट्रीय कासव दिनाच्या पूर्वसंध्येला अशी घटना होणे दुर्दैवी आहे. आंतरराष्ट्रीय रेड डेटा बुकनुसार ही धोकाग्रस्त प्रजाती आहे. कासवांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी.

- अनिल महाजन, पक्षी अभ्यासक तथा सदस्य, जैवविविधता समिती

Web Title: Hundreds of turtles die while laying aqueduct at Asoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.