कोबडी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 10:55 PM2020-03-15T22:55:56+5:302020-03-15T22:56:02+5:30
कोरोनाचा धसका : प्रचंड दर घसरल्यानंतरही ग्राहक नसल्याने चिंता
भुसावळ : कोरोना व्हायरसची सध्या सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. चीनसह अन्य देशात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर सोशल मीडियावर शास्त्रीय आधार नसलेल्या पोस्ट फिरत आहे. यामुळे मांसाहार करणाऱ्यांनी कोंबडी व अंड्यांपासून दूर राहणे पसंत केले आहे. याचा थेट परिणाम चिकन व्यवसायावर पडला असून 'कोंबडी पळाली' म्हणत व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना विषाणूच्या बातमी पाठोपाठ बॉयलर कोंबड्या व अंड्यांमार्फत हा विषाणू पसरत असल्याची माहिती सोशल मीडियावर धडकल्याने याची शहानिशा न करता मांसाहार वर्ज्य करण्याचा सल्लाही देण्यात आला. परिणामी कोंबड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली.
महिन्याभरापासून
कोंबडी ‘पळाली’
मांसाहार आणि कोरोनाचा संबंध सोशल मिडियावर जोडल्याने महिनाभरापासून अनेकांनी सर्व प्रकाराचा मांसाहार तात्पुरता बंद केला आहे. याचा फटका सर्वाधिक हा चिकनला बसला असून १८० किलो प्रति विकला जाणारे चिकन सध्या प्रति किलो ३० रुपये ते ७० रुपयांपर्यंत विकले जात आहे.
नुकसान भरपाईची मागणी
कोणत्याही रोगाचा फैलाव झाला तर त्याचा थेट संबंध कोंबडी व्यवसायाशी जोडला जातो. स्वाइन फ्लू, बर्डफ्लू व इतर अनेक आजारांचा कोंबड्यांशी संबंध जोडला गेला आहे. यामुळे दरवेळेस कोंबडीचा व्यवसाय डबघाईला जात आहे.
एकूण स्थिती पाहता शासनाने ही बाब लक्षात घेता कोंबडी व्यावसयिकांना भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.