यावल अभयारण्यात शिकार्‍यांचा वनविभागाच्या अधिकार्‍यांवर गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 06:38 PM2020-05-05T18:38:01+5:302020-05-05T18:39:34+5:30

लंगडाआंबा अभयारण्यात मध्यप्रदेशातून काही शिकारी शस्त्रांसह वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

hunters fire on forest department officers in yawal sanctuary jalgaon SSS | यावल अभयारण्यात शिकार्‍यांचा वनविभागाच्या अधिकार्‍यांवर गोळीबार 

यावल अभयारण्यात शिकार्‍यांचा वनविभागाच्या अधिकार्‍यांवर गोळीबार 

googlenewsNext

जळगाव - यावल अभयारण्यातील लंगडा आंबा भागात सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास वन्यप्राण्यांचा शिकारीसाठी आलेल्या 25 ते 30 शिकाऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बचावासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील शिकऱ्यांवर गोळीबार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

लंगडाआंबा अभयारण्यात मध्यप्रदेशातून काही शिकारी शस्त्रांसह वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर जामन्या वनक्षेत्राचे आरएफओ अक्षय मेहेत्रे व त्यांचे 13 सहकारी वनरक्षक, वनमजूर कारवाईसाठी पोहोचले. त्यांनी शिकाऱ्यांची प्राथमिक विचारपूस केली. तेव्हा शिकाऱ्यांनी ओळख लपवत आम्ही वन जमिनी तयार करण्यासाठी आल्याचे सांगितले. मात्र, अशा रितीने वन जमिनीवर अतिक्रमण करणे देखील बेकायदेशीर असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याच दरम्यान, शिकाऱ्यांकडे शस्त्र दिसल्याने वाद विकोपाला गेला. तेव्हा शिकार्‍यांनी आपल्याकडील बंदुकीतून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दिशेने गोळीबार केला. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी देखील प्रत्युत्तरात स्वतःचा बचाव करण्यासाठी हवेत काही राऊंड फायर केल्यानंतर शिकारी नदीतून पळाले. या घटनेत सुदैवाने आरएफओ अक्षय मेहेत्रे व त्यांचे सहकारी बचावल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, एसआरपी प्लाटून लंगडाआंबाच्या दिशेने रवाना झाले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कठणी टोळीचे सदस्य असण्याची शक्यता

यावल वनविभागाचा भाग मेळघाट व अनेर अभयारण्य शी जोडला गेला आहे. या भागात काही दिवसांपासून वन्यजीवांच्या  शिकारीचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी लंगडा आंबा भागात झालेल्या फायरिंगमध्ये मेळघाटला लागून असलेल्या माध्यप्रदेशातील कठणी टोळीचे सदस्य असल्याची शक्यता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

वाघाची शिकार करण्याचा हेतू 

लंगडा भागात वाघाचे अस्तित्व अनेकवेळा सिद्ध झाले आहे. लॉकडाऊनचा फायदा घेऊन अनेक शिकारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. जंगलात अतिक्रमण करणाऱ्या देखील अनेक टोळ्या आहेत मात्र सोमवारी झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर फायरिंग करणारे हे वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीतीलच सदस्य असल्याची शक्यता आहे. 

दरवर्षी घडतात प्रकार

सातपुडा पर्वतातील दुर्गम पर्वतरांगांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात वन विभागाचे अधिकारी आणि आदिवासींमध्ये वादाचे असे प्रकार घडतात. उन्हाळ्यात मध्य प्रदेशातील अनेक आदिवासी वनजमिनी तयार करण्यासाठी अतिक्रमण करतात. त्याला वनविभागाकडून विरोध झाल्यास अनेकदा टोकाचे वाद होतात. वनजमिनीवर अतिक्रमण करणारे हे आदिवासी वन्य प्राण्यांची देखील शिकार करत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

आमच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर 14 जण जंगलात गेले. आम्ही पोहचल्यानंतर त्यांनी थेट गोळीबार सुरू केला, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत. मध्यप्रदेशातील टोळी असण्याची शक्यता आहे. 

- अक्षय मेहत्रे , आरएफओ

झालेल्या प्रकारची माहिती घेतली आहे, शिकारी टोळी होती तसेच माध्यप्रदेशातूनच ही टोळी आली होती. याबाबत यावल आरएफओ यांच्याकडुन माहिती घेतली आहे. पुढील चौकशी सूरु करण्यात आली असून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 

-अनिल अंजनकर, सीसीएफ, नाशिक वनविभाग

वनक्षेत्रपाल आणि कर्मचाऱ्यांवर शिकऱ्यांकडून गोळीबार झाला ही अतिशय गंभीर घटना आहे  सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी भविष्यातील धोक्याची नांदी आहे वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वनविभागा सोबत वन्यजीव संरक्षण संस्था सदैव आहे आवश्यकता भासल्यास वनविभागास सहकार्य म्हणून त्या भागात पेट्रोलिंग करण्यास, जनजागृती करण्यास संस्थेची आपत्ती व्यवस्थापन जीवरक्षक टीम तयार असून त्या आशयाचे पत्र आम्ही वनविभाग यावल वन्यजीव यांना सादर करणार आहोत , झालेल्या निंदनीय भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.

- बाळकृष्ण देवरे संस्थापक वन्यजीव संरक्षण संस्था , जळगांव

 

Web Title: hunters fire on forest department officers in yawal sanctuary jalgaon SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव