मध्यप्रदेशातील शिकारी टोळीकडून वनरक्षकांवर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:26+5:302021-04-13T04:15:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या यावल अभयारण्य भागातील मंडप नाला व करंजपाणी या दुर्गम भागात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या यावल अभयारण्य भागातील मंडप नाला व करंजपाणी या दुर्गम भागात मध्यप्रदेशातील शिकारी टोळीने गस्तीवर असणाऱ्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या गोळीबारात कोणत्याही वनरक्षकाला इजा झाली नसली तरी या भागात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.
यावल अभयारण्य कार्यक्षेत्रात येणाऱ्या मंडप नाला व करंजपाणी या परिमंडल कक्ष ३ क्रमांक १०४मध्ये रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास वनरक्षक विजय गोरख शिरसाठ हे आपले सहकारी लेदा सीताराम पावरा, काळू बाळू पवार, अश्रफ मुराद तडवी या वनरक्षकांसह पाहणी करत होते. या पाहणी दरम्यान मंडप नाला वरील परिसरात १० ते १५ जणांचे टोळके दिसून आले. वनरक्षकांनी थोडे जवळ जाऊन पाहणी केली असता, यापैकी अनेक लोकांकडे शस्त्र आढळून आली. त्यामुळे वनरक्षकांनी थोडे दूर थांबून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. याची माहिती त्या शिकाऱ्यांना लागल्यानंतर त्यांनी या ठिकाणावरून पळ काढला.
पाठलाग होत असल्याचे कळल्यानंतर सुरु केली फायरिंग
वनरक्षक आपला पाठलाग करत असल्याचे समजल्यानंतर त्या टोळीतील काहीजणांनी थेट वनरक्षकांच्या दिशेने बंदूकीतून थेट फायरिंग सुरू केली. वनरक्षकांकडे कुठलेही शस्त्र नसल्याने सर्वांनी झाडांचा आडोसा घेऊन आपले जीव वाचविले. पुन्हा फायरिंग झाली असती तर वनरक्षकांना आपले जीवदेखील वाचवता आले नसते. तसेच जंगलात मोबाईलला रेंज नसल्याने वनरक्षकांकडून आपल्या वरिष्ठांना संपर्क करता आला नाही. काही अंतरावर असलेल्या शेणपाणी संरक्षणकुटी येथे जाऊन फॉरेस्ट रेंजर अक्षय म्हात्रे यांच्याशी दूरध्वनीव्दारे कळविले असता त्यांनी तत्काळ लंगडाआंबा मुख्यालयात बोलावले. यानंतर यावल येथे येऊन पोलिसात विजय गोरख शिरसाठ यांनी अज्ञात शिकाऱ्यांच्या विरोधात फिर्याद दिली.
घटनास्थळी जाऊन केला पंचनामा
अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील ,पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व पोलीस अंमलदार सुशील घुगे, भूषण चव्हाण, असलम खान हे घटनेचा तपास करीत आहेत. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने तपासकामी करंजपाणी या घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच या ठिकाणी पंचनामादेखील करण्यात आला आहे. पोलिसांनी या परिसरात पाहणी केली असून, फायरिंग झाल्याची पुष्टी पोलिसांकडून करण्यात आली आहे.
कोट...
काल यावल अभयारण्यात शिकाऱ्यांकडून गोळीबाराची घटना घडली, यावल वन्यजीव अभयारण्यात वनकर्मचारी बांधवांवर होणारे जीवघेणे भ्याड हल्ले हे निंदनीय आहेत. आम्ही पूर्णपणे वन विभागासोबत आहोत. सदर घटनेची गंभीरपणे दखल घेऊन संबंधित आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करून गुन्हा दाखल केला पाहिजे.
-रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक, जळगाव
यावल अभयारण्यात वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या घटना बघता आता या भागात राज्य राखीव दलाची तुकडी कायमस्वरूपी देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वन कर्मचारी संख्या वाढवणे, अतिरिक्त रेंज ऑफिसची निर्मिती, गस्ती पथकाला सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक वाहने, साहित्य, शस्त्र पुरवठा गरजेचा आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहोत. लवकरच आमच्या मागण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
- बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव