जळगाव तालुक्यात कुसुंबा येथे तुफान हाणामारी; ४ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:08 PM2019-08-13T12:08:47+5:302019-08-13T12:08:58+5:30
हॉटेलची तोडफोड
जळगाव : माफीचा साक्षीदार होऊ नये आणि मुलाला शिवीगाळ का करतो, या कारणावरुन कुसुंबा येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात तलवारींसह लोखंडी रॉड आणि दगडाचा वापर करण्यात आल्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बसस्थानकावर जवळ घडली़ याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तसेच एका हॉटेलाची सुध्दा तोडफोड करण्यात आली आहे़
कुसंब्यातील रवींद्र शांताराम बाविस्कर यांचा गावातील बस स्टॉपजवळ दुध विक्री व हॉटेल व्यवसाय आहे़ सोमवारी सकाळी ते वडील शांताराम व भाऊ प्रवीण असे हॉटेलवर आले होते़ त्यावेळी श्रावण शेनफडू कोळी व हिंमत नामदेव पाटील हे दोघे त्याठिकाणी आले़ तुझा भाऊ प्रवीण हा माझा मुलास शिवीगाळ करतो असे म्हणत श्रावण याने रवींद्र याच्याशी वाद घातला़ त्याचवेळी पंडीत कोळी, योगश कोळी, गोलू कोळी, गणेश कोळी, भावलाल पाटील, चंद्रकांत पाटील, मयुर पाटील, चेतन पाटील, नीलेश पाटील, जगन्नाथ कोळी, राजू कोळी (सर्व रा़ कुसुंबा) हे सुध्दा त्याठिकाणी आले व त्यांनी अचानक रवींद्र यांच्यासह त्यांचे वडील व भावास मारहाण करण्यास सुरूवात केली़ लोखंडी रॉड व लाठा-काठ्यांनी वापर झाला. त्यात रवींद्र हा जखमी झाला़ तसेच जमावाने हॉटेलवर दगडफे करून तोडफोड केली़ नंतर गल्ल्यातील ७ हजार रूपये जबरीने काढून घेतले़ याबाबत एमआयडीसी पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल आहे़
माफीचा साक्षीदार का झाला? म्हणत केले तलवारीने वार
दुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेतकरी श्रावण शेनफडू कोळी हा वास्तव्यास आहे़ सोमवारी सकाळी ते बस स्टॉपजवळ विकास दूध वाटपासाठी आले होते़ त्यावेळी त्याठिकाणी प्रवीण शांताराम कोळी, रवींद्र कोळी, विशाल कोळी, विजू (पूर्ण नाव माहित नाही), शांताराम कोळी हे पाचही जण तेथे आले़ त्यांनी तु माफीचा साक्षीदार का झाला? असे म्हणत श्रावण यांना मारहाण करण्यास सुरूवात केली़ त्यानंतर प्रवीण याने श्रावण याच्या मानेवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्याने तो वार चुकवला आणि तलवार कानावर लागली. रवींद्र याने श्रावण याच्या हाताच्या बोटावर कोयत्याने वार केले़ तर शांताराम याने लोखंडी रॉडने श्रावण यास मारहाण केली़ श्रावण कोळी व रवींद्र बाविस्कर (कोळी) यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंत्री गुलाबराव पाटील व निरीक्षक यांच्यात वाद
कुसुंब्याच्या हाणामारी प्रकरणासंदर्भात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरिक्षक रणजित शिरसाठ यांच्याशी संपर्क साधला. त्यात वाद झाल्यामुळे रात्री ११ वाजेच्या सुमारास शिवसेना कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते़ तासाभराच्या चर्चेनंतर शिवसैनिक पोलीस ठाण्यातून बाहेर पडले़