पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:17 AM2021-04-07T04:17:26+5:302021-04-07T04:17:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वर्षानुवर्षे सोबतीने संसार केल्यावर लक्ष्मी नगरातील रहिवासी शंकुतला दौलत सरोदे आणि दौलत लक्ष्मण सरोदे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वर्षानुवर्षे सोबतीने संसार केल्यावर लक्ष्मी नगरातील रहिवासी शंकुतला दौलत सरोदे आणि दौलत लक्ष्मण सरोदे या दाम्पत्याचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. शंकुतला सरोदे यांनी ३० मार्च रोजी तर दौलत सरोदे यांनी ५ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर अखेरचा श्वास घेतला.
शंकुतला सरोदे या २०१६ मध्ये तर दौलत सरोदे हे २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. काही दिवस आधी दोघांचीही प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयुष्यभर एकत्रच राहिलेले हे जोडपे अखेरच्या वेळी देखील एकमेकांच्या जवळच होते. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर त्यांना एकमेकांच्या शेजारीच ठेवण्यात आले होते. त्यातच ३० मार्च रोजी शंकुतला सरोदे यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना हृदयविकाराचा त्रास गेल्या काही वर्षांपासून होता. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. मात्र तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली नाही. अखेर ३० मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्याच वेळी दौलत सरोदे यांनी पत्नीच्या प्रकृतीची विचारणा केली. निधनाची माहिती त्यांना कळू नये आणि त्यांची प्रकृती अजून बिघडू नये म्हणून त्यांना व्हेंटिलेटरसाठी दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर खिन्न झालेले दौलत सरोदेदेखील बरे होऊ शकले नाहीत. त्यांना फुफ्फुसाशी संबंधित त्रास सुरू झाला. त्यांनी ५ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांना रुग्णालयातील कर्मचारी आणि कुटुंबीयांनी जरी पत्नीच्या मृत्यूची माहिती दिलेली नसली तर त्यांना बहुतेक त्याची जाणीव झाली असावी.
कष्टातून फुलवलेला संसार पत्नीशिवाय बघण्याची त्यांची कदाचित इच्छाच नसावी, त्यामुळे तेदेखील पत्नीसोबतच गेले असावेत.
सरोदे दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले पराग आणि कुंदन, सुना असा परिवार आहे.