पतीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:42 PM2020-09-25T21:42:49+5:302020-09-25T21:43:00+5:30
पत्नीने नशिराबाद पोलिसांकडे नोंदविला जबाब : कारागृह अधीक्षकांवर ठेवला गंभीर ठपका
जळगाव : शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील रवींद्र उर्फ चिन्या जगताप याचा ११ सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा तपास सुरू असून शुक्रवारी मयताच्या पत्नीने तिचे म्हणने जबाबातून नोंदविले. त्यात कारागृह अधीक्षकांवर गंभीर ठपका ठेवण्यात आला असून पतीचा मृत्यू हा कारागृहात पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचे जबाबात म्हटले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
११ सप्टेंबर रोजी रवींद्र उर्फ चिन्या जगताप याचा कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला होता. मृतदेह जिल्हा रूग्णालयात पोलिसांनी आणल्यानंतर पतीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप पत्नी मिनाबाई यांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी नशिराबाद पोलिसांनी मिनाबाई यांना २५ सप्टेंबर रोजी समक्ष हजर राहून जबाब देण्यासाठी बोलविले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजता पोलीस ठाण्यात राहून मिनाबाई यांनी हजर राहून जबाब नोंदविले.
काय आहे जबाबात
जबाबात मिनाबाई यांनी म्हटले की, ११ सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहात पतीला भेटण्यासाठी गेल्या असता, शिपाई कविता साळवे यांना त्यांनी पती कसे आहेत, असे विचारले, साळवे यांनी ते व्यवस्थित असल्याचे सांगितले आणि तुम्हाला भेटायचे असेल तर कोर्टाची ऑर्डर आणा असे सांगितले. नंतर मिनाबाई घरी निघून गेल्या. काहीवेळानंतर पतीचा मृत्यू झाल्याचे कळताचे त्यांनी कारागृहाकडे धाव घेतली. त्यांना चिन्याची तब्बेत खराब असल्याचे सांगून गोदावरी रूग्णालयात जाण्याचे सांगितले. नंतर गोदावरी रूग्णालयात आल्यानंतर त्यांनी पतीचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. मृतदेहाची पाहणी केली असता, डोळे उघडे होते, कपडे चिखलाचे भरलेले व फाटलेले होते. पूर्ण शरीर आलेचिंब झालेले. मारहाणीमुळे पाठ निळी पिवळी झालेली होती. डाव्या डोळ्याच्या खाली मार लागलेला होता. पोलीस मारतात त्याप्रमाणे अंगावर जखमा होता, असे मिराबाई यांच्या जबाबात म्हटले आहे.
संबंधितांवर गुन्हा दाखलची मागणी
कारागृह अधीक्षकांसह त्याठिकाणी उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी पतीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे, असेही जबाबात म्हटले आहे. त्यामुळे संबंधितांवर खूनाचा व पुरावा नष्ट केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी त्यात करण्यात आली आहे. हा जबाब पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आला आहे.