दुचाकीचा हट्ट पुरवला नाही अन् त्याने गळफास घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:16 PM2020-06-29T12:16:56+5:302020-06-29T12:17:08+5:30
सिंधी कॉलनीतील घटना : लॉकडाऊनमुळे व्यवसायही चालत नसल्याने पालकांनी टेकले परिस्थितीपुढे हात
जळगाव : होय! आज परिस्थितीमुळेच एका तरूणाने आत्महत्या केली. आई-वडिलांना आपल्या मुलासाठी खूप काही करायचे होते. त्याला त्याने मागितली होती, तशी दुचाकीही घेऊन द्यायची होती. पण परिस्थितीने त्यांना हात टेकायला भाग पडले अन् आपला हट्ट पुरा न झाल्याने नैराश्याच्या भरातच त्यांच्या लाडक्या मुलाने स्वत:च्याच गळ्याभोवती फास आवळला. रविवारी सायंकाळी सिंधी कॉलनीत ही घटना घडली़ कमल भिषणचंद तुलसी (१८, रा़ सिंधी कॉलनी, मुळ रा़ फैजपूर) असे मयत तरूणाचे नाव आहे़
भिषणचंद जसूमल तुलसी हे मुळचे फैजपूर येथील रहिवासी आहेत. वर्षभरापूर्वीच ते शहरातील सिंधी कॉलनी भागात कुटूंबासह राहण्यासाठी आले़ त्यांचे मालकीचे दीक्षित वाडीत स्पेअर पार्टचे दुकान आहे़ हे दुकान मुलगा कमल सांभाळत होता़ दरम्यान, काही दिवसांपासून कमल हा पालकांकडे सुमारे एक ते दीड लाखाची महागडी दुचाकी खरेदी करून देण्यासाठी हट्ट करीत होता़ परंतु, लॉकडाऊन असल्यामुळे व्यवसायही ठप्प झाला होता. परिस्थिती अतिशय नाजूक होती. त्यामुळे सध्यातरी महागडी दुचाकी नको. हळूहळू सगळं सुधारेल, त्यावेळी तुला हवी तशी दुचाकी घेऊन देऊ, असे आश्वासन पालकांनी त्याला दिले होते. पण, आपले आईवडिल आपला हट्ट पुरवू शकत नाही, हाच विचार त्याच्या मनात होता आणि त्यातून त्याला नैराश्य आले होते. रविवारी सायंकाळी त्याने सिंधी कॉलनीतील घरातच गळफास घेतला अन् जीवन संपवले.
दरम्यान, आपल्या मुलाने गळफास लावून घेतल्याचे कळताच आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी त्याचा मृतदेह खाली उतरवला.
आई-वडीलांना पाठविले पायमोजे घेण्यासाठी
रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास कमल याने आई-वडीलांना पायमोजे घेवून यावे, असे सांगितले़ त्यामुळे पालक सिंधी कॉलनी स्टॉपजवळ मुलासाठी पाय मोजे घेण्यासाठी गेले असता, कमल याने घरात कुणीही नसताना गळफास घेवून आत्महत्या केली़ आई-वडील घरी येताच त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच हंबरडा फोडला़ नंतर त्याला शेजारचाच्या मदतीने खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासणीअंती मृत घोषित केले़ रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला़ दरम्यान, कमल याच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी आहेत़