अमळनेरमध्ये खान्देश रक्षक संघटनेतर्फे हुतात्मा मशाल रॅली; ५०० फूट लांबीच्या तिरंग्याने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 05:46 PM2022-01-30T17:46:25+5:302022-01-30T17:46:53+5:30
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे रविवारी हुतात्मा दिनानिमित्त खान्देश रक्षक संघटनेतर्फे हुतात्मा मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
जळगाव: जिल्ह्यातील अमळनेर येथे रविवारी हुतात्मा दिनानिमित्त खान्देश रक्षक संघटनेतर्फे हुतात्मा मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहिद सैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये देशभक्ती व राष्ट्रभक्तीचा जागर निर्माण व्हावा, म्हणून मशाल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत ५०० फूट लांबीच्या तिरंग्याने शहरवासीयांचे लक्ष वेधलं. रॅलीच्या समारोपप्रसंगी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून माजी आमदार स्मिता वाघ, शिरीष चौधरी यांच्या हस्ते स्मारक पूजा व मशाल पेटवून रॅलीला सुरुवात झाली. सानेगुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ५०० फुटाचा तिरंगा धरला होता. एका जीपवर हुतात्मा स्मारक उभारण्यात आले होते. माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाबाहेरील पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. रॅलीचे आयोजन खान्देश रक्षक संस्थेचे संयोजक विवेक पाटील, तालुकाध्यक्ष विजय सूर्यवंशी, उपाध्यक्ष विलास महाले, धनराज पाटील, हर्षल पाटील, महेंद्र बागुल, शरद पाटील, राजेंद्र यादव व आजी माजी सैनिकांनी केले होते. खान्देश रक्षक संघटनेतर्फे शहरातील सर्व महापुरुषांची स्मारके व पुतळ्यांना पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले. रॅली सानेगुरुजी शाळेत आल्यानंतर तिचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शहिद सैनिकांचे कुटुंबीय आणि माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की देशासाठी सैनिकांचे योगदान महत्वपूर्ण असते. सैनिकांच्या दक्षतेमुळे आणि प्रामाणिक कर्तव्यामुळे आपण आज जिवंत आणि सुरक्षित आहोत, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी खान्देश रक्षक संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी शेतकी संघ प्रशासक संजय पाटील, संदीप घोरपडे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन विजय सूर्यवंशी व संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमास खान्देशातील आजी माजी सैनिकांसह माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, प्रा. सुरेश पाटील, सचिन पाटील, शिवराम पाटील, संजय पाटील, संदीप घोरपडे, हेमकांत पाटील, मनोज शिंगाणे, आशिष पाटील, गुरव, मुख्याध्यापक सुनील पाटील, डी. ए. धनगर, डी. के. पाटील, अरुण पाटील, संजीव पाटील, विद्या पाटील हजर होते.