हैदराबादला जाणवतेय बेअरस्टोची उणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:18 AM2021-09-27T04:18:41+5:302021-09-27T04:18:41+5:30
एक असा संघ जो गुणतक्त्यात सर्वात खालच्या स्थानावर आहे. आणि पात्रता फेरी गाठण्याची त्यांच्याकडे संधी नाही. अशा संघाकडे गमावण्यासारखे ...
एक असा संघ जो गुणतक्त्यात सर्वात खालच्या स्थानावर आहे. आणि पात्रता फेरी गाठण्याची त्यांच्याकडे संधी नाही. अशा संघाकडे गमावण्यासारखे काहीही नसते. हैदराबादच्या संघाने या सत्रात खूपच खराब खेळ केला आहे. पंजाबविरोधात १२५ धावांसमोर हैदराबादचा संघ अशा पद्धतीने कमी पडला जसा तो या आधीच्या प्रत्येक सामन्यात होता. डेव्हिड वॉर्नरच्या खराब फॉर्मपेक्षा हैदराबादच्या संघाला जॉनी बेअरस्टोची उणीव भासत आहे. जॉनी संघाला वेगाने सुरुवात करून देत होता. आणि संघात त्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण होत होते.
जेव्हा कोणताही खेळाडू खराब फॉर्ममधून जात असतो. तेव्हा काहीच योग्य होत नसते. अशात तो एक फलंदाज म्हणून बाद होण्याचे विचित्र मार्ग निर्माण करतो.
वॉर्नर यूएईमध्ये पहिल्या सामन्यात बॅटची कड घेऊन जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला होता. पंजाबच्या शमीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर शॉट मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. आशा आहे की तो उरलेल्या सामन्यात चांगली सुरुवात करू शकेल. हैदराबादने त्यासोबतच आक्रमक फलंदाजांऐवजी तांत्रिकदृष्ट्या योग्य फलंदाजांना खेळवायला हवे. तांत्रिक फलंदाज हे हिटरपेक्षा जास्त चांगली सुरुवात करून देऊ शकतात. हिटर एखाद्या सामन्यात चालतात आणि महत्त्वाच्या वेळी चुकीचा फटका मारून बाद होतात.
त्या तुलनेत राजस्थानचा संघ जरा चांगला आहे. मात्र या संघाला खेळात सातत्य ठेवता आले नाही. राजस्थानचे खेळाडू सोशल मीडियावरच जास्त व्हायरल होत आहेत. संजू सॅमसन एक चांगला माणूस आणि कर्णधार आहे. मात्र त्याला खेळाडूंना हे सांगावे लागेल की मैदानावर आनंद व्यक्त करण्याच्या वेगळ्या मार्गापेक्षा क्रिकेटमधील यशाने व्हायरल होणे हे जास्त महत्त्वाचे असते. तीन सर्वोत्तम खेळाडूंची भरपाई करणे कठीण आहे. जोस बटलर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे गेम चेंजर आहेत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत राजस्थानला बिलकुल मदत मिळत नाही. युवा खेळाडूंना हे शिकायला हवे की स्टोक्स मैदानावर त्याचे शंभर टक्के देतो. सध्याच्या काळात तो सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तो त्याच्या खेळाप्रति खूपच गंभीर आहे आणि संघाप्रति समर्पित आहे. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून शिकण्याची गरज आहे.
पंजाबच्या विरोधातील कार्तिक त्यागीचे अखेरचे षटक हे चांगले राहिले. मात्र आता तो भूतकाळ झाला. त्याला अशी कामगिरी पुन्हा पुन्हा करावी लागेल. त्यामुळे राजस्थानच्या संघाला प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मिळेल.