कर्ज, दुष्काळ आणि आजाराला कंटाळून मी आत्महत्या करतोय..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 04:52 PM2019-09-14T16:52:03+5:302019-09-14T16:54:23+5:30
दुर्देवी घटना : कढोली येथील वृध्द शेतकऱ्यांची विष घेऊन आत्महत्या
जळगाव- माझ्यावर एक लाख रूपयांचे पीक कर्ज व इलेक्ट्रीक मोटारीचे एक लाखाचे बील आणि मागील वर्षाचा दुष्काळ व आता सततच्या पावसामुळे पिंकांची झालेली नासाडी, एवढेच नव्हे तर विविध आजारांनी त्रस्त असून मी आत्महत्या करित आहे़़़अशी आशयाची चिठ्ठी लिहून एरंडोल तालुक्यातील कढोली येथील लक्ष्मण ओंकार पाटील (वय-७०) या कर्जबाजारी वृध्द शेतकºयाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान, वृध्द शेतकºयाचा मृतदेह हा वैजनाथ-कढोली गावाच्या रस्त्यावर आढळून आला आहे.याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एरंडोल तालुक्यातील कढोली गावात लक्ष्मण पाटील हे पत्नी लिलाबाई व मुले हिंमत व लिलाधर यांच्यासह वास्तव्यास होते़ शेती काम करून ते घरचा उदरनिर्वाह करायचे. मात्र, मागील वर्षी दुष्काळ पडला सोबतच या वर्षी सततच्या पावसामुळे पिकांची नासाडी झाली. त्यामुळे लक्ष्मण पाटील हे नैराश्यात होते. सोबतच डोक्यावर कर्जाचे डोंगर आणि मुळव्याध व गुडघे दुखीच्या आजारामुळे ते त्रस्त झाले होते. त्यातच शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास लक्ष्मण पाटील हे गावाला जाऊन येतो, असे कुटूंबीयांना सांगून घराबाहेर पडले.
वैजनाथ-कढोली रस्त्यावर आढळला मृतदेह
वैजनाथ-कढोली गावाच्या रस्त्यावरून सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास एक दुध विक्रेता जात असताना रस्त्याच्याकडेला कुणीतरी वृध्द व्यक्ती मयत स्थितीत पडून असल्याचे दिसले. त्याने त्वरित कढोली गावातील पोलीस पाटील रामदास सोनवणे यांना कळविले. नंतर सोनवणे यांनी त्वरित एरंडोल पोलिसांनी याबाबत माहिती दिली़ काही वेळानंतर वृध्द व्यक्ती ही कढोली गावातील लक्ष्मण पाटील असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना त्वरित जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतू, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाटील यांना तपासणीअंती मृत घोषित केले.
सुसाईड नोट सापडली
मृतदेहाची झडती पोलिसांनी व नागरिकांनी घेतली असता खिशामध्ये सुसाईड नोट अर्थात आत्महत्यापूर्वी लिहीलेली चिठ्ठी आढळून आली आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे़ दरम्यान, पाटील यांच्या आत्महत्तेची बातमी गावात पसरताच ग्रामस्थांसह कुटूंबीयांची जिल्हा रूग्णालयात एकच गर्दी झालेली होती. याबाबत सीएमओ अपूर्वा चित्ते यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.