मी आहे नवीन डीन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:32 AM2020-05-26T11:32:30+5:302020-05-26T11:32:47+5:30
रुग्णालय परिसरात विनामास्क वावर : सहयोगी प्राध्यापकाचा प्रताप, डॉ. पोटे यांनी मागविला खुलासा
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीर क्रियाशास्त्र विभागाच्या एक सहयोगी प्राध्यापक चंद्रशेखर डांगे हे थेट अधिष्ठातांच्या खुर्चीवर विराजमान झाले़ त्यावेळी आपण नवीन डीन असल्याचे त्यांनी सांगितल्यावर उपस्थितही चक्रावले. प्रभारी अधिष्ठाता डॉ़ मारूती पोटे यांनी तात्काळ या प्राध्यापकाला नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.
डीन कॅबीनमध्ये गेल्यानंतर संबधित प्राध्यापकाने अन्य कर्मचाऱ्यांच्या पाया पडल्या़ बराच वेळ चाललेल्या या प्रकारानंतर या प्राध्यापकाने थेट डीन यांची खुर्ची सांभाळली व त्यावर ते थेट विराजमान झाले़ आजुबाजुलाही काही प्रमुख डॉक्टर बसलेले होते़ या प्राध्यापकांच्या या प्रतापाचा व्हिडीओ काही सेंकदातच सोशल मीडियावर व्हायलर झाला.
विशेष बाब या प्राध्यापकांनी मास्क किंवा सुरक्षा साहित्य परिधान केलेले नव्हते़ सध्या अधिष्ठांतांच्या खुर्चीवरून जळगावच्या शासकीय महाविद्यालयात रणांगण सुरू असल्याचे चित्र असतानाच या प्राध्यापकाने खुर्चीवर बसणे हा चर्चेचा विषय झाला आहे़
मी आहे नवीन डीन...
हे प्राध्यापक महोदय जवळपास अर्धा तास अधिष्ठाता यांच्या कार्यालयात होते. अनेक वेळा त्यांनी असा प्रकार केला असून काही दिवसांपूर्वीही ते अशाच प्रकारे थेट दालनात आले होते़ त्यांचे वाहनही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे़ दरम्यान, खुर्चीवर बसल्यानंतर आपण या ठिकाणी नवीन डीन म्हणून रूजू झालो असून आपली कोरोनाची टीम असून कोरोनाबाबत नियोजन करीत असल्याचे ते सांगत होते़ बराच वेळ हा गोंधळ सुरू होता़ दोन दिवसांपूर्वीही ते आले व थेट टेबलवर पाय ठेवून बसल्याची माहिती समोर आली आहे़ दरम्यान, यावेळी गोंधळ उडाला होता़
तर थेट संचालकांकडे तक्रार
प्रभारी अधिष्ठाता पोटे यांनी या प्राध्यापकाला नोटीस बजावून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत़ खुलासा व्यवस्थित नसल्यास थेट संचालकांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ़ पोटे यांनी दिली आहे़