कुस्ती संघटनेचा राज्याचा मी अध्यक्ष, आम्ही कुणाशी पण कुस्ती खेळत नाही; पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 10:24 AM2019-10-14T10:24:24+5:302019-10-14T10:28:18+5:30
चाळीसगाव विधानसभा निवडणूक 2019 - मात्र शहा दिलेला शब्द किती पाळतात हे मला चांगलं माहीत आहे म्हणून मी त्याची चौकशी केली तर त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही.
चाळीसगाव - मुख्यमंत्री सांगतात आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. परंतु कुस्तीचा राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे आणि ते म्हणतात आमच्याकडे पैलवान नाही आम्ही कुणाशी पण कुस्ती खेळत नाही आणि तुम्ही त्या भानगडीत पडूच नका अशी जोरदार उपरोधिक कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांना लगावली. राष्ट्रवादी आघाडीचे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजीव देशमुख यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अमित शहा यांनी वाल्मिकी समाजाला काही सवलतीच्याबाबतीत आश्वासन दिलं. मात्र शहा दिलेला शब्द किती पाळतात हे मला चांगलं माहीत आहे म्हणून मी त्याची चौकशी केली तर त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे आजच्या सत्ताधारी लोकांची भूमिका सांगायचं एक आणि त्याची पूर्तता करायची नाही अशीच आहे असा टोला शरद पवार यांनी लगावला.
मुख्यमंत्री सांगतात त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की आपल्या राज्यात कुस्ती हा महत्त्वाचा खेळ आहे आणि कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही. pic.twitter.com/T9jOJyq6lQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 13, 2019
तसचे भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा राज्यात येवून गेले. ते म्हणतात महाराष्ट्रात आम्हाला विरोधकच नाही. त्यांनी प्रचंड मोठी सभा घेतली त्यात ते बोलत होते. साधारण पन्नास एक जण उपस्थित होते त्यांच्या सभेला अशी यांची सभा आणि ते सांगतात की, आमच्याशी तोड नाही म्हणून अशी खिल्ली शरद पवार यांनी उडवली.
दरम्यान, मागची पाच वर्ष हातात सत्ता तुमची आणि हे इथे येऊन आम्हाला बोलतात तुम्ही काय केलं. तुम्ही जबाब द्यायला हवा पाच वर्ष सत्ता तुमच्या हाती होती. आता याचं उत्तर जनता २१ तारखेला देवून तुम्हाला धडा शिकवला शिवाय शांत बसणार नाही असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला. राज्यातील प्रश्न काय आणि पंतप्रधान येऊन ३७० कलमाबद्दल पवारांनी उत्तर देण्याची मागणी करतात. अरे लोकांच्या पुढे ३७० हा प्रश्न नाहीये तर शेतीच्या समस्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली? कर्जबाजारीपणा का वाढलाय? हे प्रश्न सोडविण्याचे सोडून ३७० चा मुद्दा पुढे करतात असे सांगतानाच आज शेगावला एका शेतकरी बांधवाने आत्महत्या केली याची आठवण सरकारला करुन दिली.