मी म्हणे गोपाळू आला गे माये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 09:01 PM2019-04-28T21:01:03+5:302019-04-28T21:01:33+5:30

वारकरी संताच्या स्फूट अभंगरचना निर्मितीत ‘विरहिणी’ अभंगाची रचना आहे. वारकरी परंपरेच्या सर्व संताच्या अभंग रचनेचा ‘भक्ती’ हा पाया आहे. ...

I came to swallow and said ... | मी म्हणे गोपाळू आला गे माये...

मी म्हणे गोपाळू आला गे माये...

Next

वारकरी संताच्या स्फूट अभंगरचना निर्मितीत ‘विरहिणी’ अभंगाची रचना आहे. वारकरी परंपरेच्या सर्व संताच्या अभंग रचनेचा ‘भक्ती’ हा पाया आहे. भक्ती ही नवविधा स्वरूपाची असल्याचे भागवत महापुरणात प्रतिपादित आहे.
श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्म निवेदनम्।।
ही नवविधा भक्ती आचरणारे अनेक महान भक्त होवून गेले. परंतु परमेश्वराशी आत्यंतिक एकता साधणाऱ्यांसाठी स्त्री-पुरूष मिलनातील उत्कटावस्थाच आदर्श मानली जाते आणि त्यातूनच मधुराभक्तीचा उदय झाला आहे. ‘‘मधुराभक्ती’’ म्हणजे श्रृंगारभक्ती, परमेश्वराशी पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसीचे नातं जोडून जी भक्ती केली जाते, त्याला मधुराभक्ती असे नाव वैष्णवांनी दिले आहे. भगवान श्रीकृष्ण व गोपी यांची भक्ती ही मधुराभक्तीत मोडते. मानवी अनुरागाची व मिलनाची शेवटची पायरी म्हणजे स्त्री-पुरूषाचे, पती-पत्नीचे प्रेम हीच होय. आत्म्याने परम तत्वांशी, जीवाने-शिवाशी असा संबंध स्थापन करण्याचा अनुरागयुक्त प्रयत्न असतो, त्यातून मधुराभक्तीचा उगम झालेला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी गोप-गोपीची मधुराभक्ती रंगविली आहे. यात कधी श्रृंगार तर कधी वात्सल्य भाव प्रगट होतांना दिसतो. ज्ञानोबांना भक्ती प्रेमाची मातब्बरी कैवल्य प्राप्तीपेक्षाही मोठी वाटते. परब्रह्मांचे निर्गुण रूप श्रीविठ्ठलाच्या रूपाने सगुण साकार झाले आहे. हे खालील विरहिणीत दिसते.
पंढपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईये वो ।।१।।
वेधले वो मन तयाचिये गुणी । क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे ।।२।।
या विरहिणीतून संत ज्ञानोबांच्या जीवाची श्रीविठ्ठल भेटीसाठी आत्यंतिक ओढ, तळमळ आणि त्याच्या अभावी होणारे असह्य विरह दु:ख दिसून येते.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ‘माझ्या जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।
संत ज्ञानोबांच्या विरहिणी या पांडुरंगाशी एकरूप करतात, श्री विठ्ठलाचे स्वरूप साºया स्थिरचरात भरून राहिल्याचा प्रत्यय येतो, आर्त विरहिणीची अशी अवस्था शारीरिक व मानसिक पातळवीरही अनुभवता येईल इतके हृदयस्पर्शी चित्रण माऊलींनी केले आहे. भक्ती सुखाचा अपूर्व अनुभव या विरहिणीद्वारे येतो. विरहाच्या वेदनेतही एक प्रकारचे गोड सुख प्राप्त होतांना दिसते.
ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी म्हणजे श्रेष्ठ भक्तीचा अविष्कार आहे. अंतरंग अनुभव विरहिणी भजनाद्वारे त्यांनी प्रगट केला आहे. विरहिणी ही विठ्ठल वल्लभ व जीव कांता असा भाव आहे आणि या नात्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरिता तळमळणारी ही अवस्था आहे.
अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू ।
मी म्हणे गोपाळू आला गे माये ।।
या विरहिणीतून भेटीची लागलेली ओढ, उत्सुकता, आर्तता, तगमग, हुरहुर प्रगट होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयातील विरहिणी या अतिश्य मधूर आहेत.

- डॉ.कैलास पाटील, पिंपळेसीम ता.धरणगाव.

Web Title: I came to swallow and said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.