मला कोरोना ईडीच्या तारखा पाहून होत नाही - गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:16 AM2021-03-31T04:16:57+5:302021-03-31T04:16:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मी कोरोना पॉझिटिव्ह होतो. मात्र मला झालेला कोरोना हा ईडीच्या तारखा पाहून होत नाही, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मी कोरोना पॉझिटिव्ह होतो. मात्र मला झालेला कोरोना हा ईडीच्या तारखा पाहून होत नाही, असा टोला माजी मंत्री गिरीष महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना लगावला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी ते जाणार आहेत.
माजी मंत्री गिरीष महाजन यांनी एकनाथ खडसे यांना झालेला कोरोना हा संशोधनाचा विषय असल्याचे वक्तव्य काही दिवसांपुर्वी केले होते. त्यानंतर खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या कोरोनाबाबत वक्तव्य केले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मला एकदाच कोरोना झाला. मी रुग्णालयात दाखल होतो. चार वेळा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. मला कोरोना इडीच्या तारखा पाहून होत नाही. एकनाथ खडसे यांना इडीची तारीख आली की कोरोना होतो. आणि मग ते घरीच क्वारंटाईन किंवा मुंबईत बाहेर फिरतात. असा आरोप देखील महाजन यांनी केला.
गिरीश महाजन यांनी मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट दिली. त्यावेळी त्यांनी जळगाव महापालिकेतील सत्तातंर नाट्याबाबत देखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, जे नगरसेवक फुटले त्यांच्यावर कारवाई होणारच. त्यांना वाचविण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी देखील त्यांचे पद हे जाणारच आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार काय कारवाई करायची, हे आम्ही बघु, असा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला.
शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांना तुरुंगात डांबणे, योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कोरोनामुळे शांत आहोत. नाहीतर आम्ही आवाहन केले असते तर हजारो शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा देखील महाजन यांनी दिला.