मला पक्षशिस्त शिकवण्याची गरज नाही : माजी मंत्री एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 07:40 PM2018-06-23T19:40:51+5:302018-06-23T19:44:31+5:30
मला पक्षशिस्त शिकवण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. पक्षात ४० वर्षे घालवली असून पक्षशिस्त मला माहीत आहे. त्यानुसारच मी वागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव- मला पक्षशिस्त शिकवण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. पक्षात ४० वर्षे घालवली असून पक्षशिस्त मला माहीत आहे. त्यानुसारच मी वागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना ते बोलत होते.
शनिवारी सायंकाळी जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी ही पत्रपरिषद झाली. यावेळी एका प्रश्नास उत्तर देताना ते म्हणाले की, अंजली दमानियांमार्फत माझी बदनामी करण्यामागे भाजपातील एका मंत्र्याचा हात आहे, हे विधान माझे नाहीच, तर सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांंनी हे विधान केले आहे. यावरुन मी मुख्यमंत्र्यांकडे हा मंत्री कोण? याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्र्यानीही याबाबत चौकशीचे आदेश दिले आहे. मी हे विधान केले नसताना माझ्या तोंडी ते घालण्यात आले. काय बोलावे व कोठे बोलावे हे मला समजते, असेही खडसे म्हणाले. त्यासाठी कुणी पक्षशिस्त शिकविण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
अवैध धंद्यात वाचविण्यासाठी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पैशांच्या डिलींगबाबत जो आरोप झाला आहे, तो गंभीर आहे. माझ्यावर आरोप झाले असता मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. वाघ यांंनीही नैतिकता दाखवून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. आपली ही मागणी पक्षहिताच्या दृष्टीने असून आरोपात तथ्य नाही आढळले तर पुन्हा वाघ यांनी पद स्विकारावे, अशीच आपली भूमिका आहे. याबाबतही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी आपण बोललो आहे. ही बाब पक्षापुढे ठेवल्यानंतरच मिडियापुढे मांडली. एवढेच नाही तर मी आज ही पत्रपरिषद बोलावली आहे, त्याबाबतही दानवे यांना कल्पना दिली आहे. त्यामुळे पक्षशिस्त मला सांगण्याची गरज नाही. मी सर्व संकेत पाळूनच वागत असतो, असेही खडसे म्हणाले.
अंजली दमानिया यांच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात दाखल तक्रारीत चौकशी अधिकारी हा दमानिया यांच्या मागणीवरुन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांंनी बदलला असून कराळे हे कोणाच्या तरी दबावात किंवा आर्थिक व्यवहारामुळे नियमबाह्य काम करीत असल्याचा आरोपही खडसे यांनी पत्र परिषदेत केला.