मेरे पास सिर्फ माँ है
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:49+5:302021-06-06T04:12:49+5:30
कुटुंब चालवणारा गेला, सरकारने तरी मदत करावी, जिल्हा प्रशासनाने केले मदतीचे प्रस्ताव, सामाजिक संघटनाही धावल्या मदतीला लोकमत न्यूज नेटवर्क ...
कुटुंब चालवणारा गेला, सरकारने तरी मदत करावी, जिल्हा प्रशासनाने केले
मदतीचे प्रस्ताव, सामाजिक संघटनाही धावल्या मदतीला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे आई आणि वडील असा दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ७ बालके अशी आहेत. ज्यांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे. तर १९१ बालकांनी आपले एक पालक कोरोनामुळे गमावला आहे.
नुकतीच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी एका कृती दलाची बैठक घेतली होती. त्यात या मुलांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात दोन्ही पालक गमावलेल्यांमध्ये लग्नाच्या वयाच्या मुलीदेखील आहेत. त्यांची जबाबदारी सामाजिक संघटनांनीदेखील घेतली आहे.
आई-वडील दोघांचा कोरोनाने मृत्यू
रावेर तालुक्यातील एका कुटुंबात आई आणि वडील या दोघांचा कोरोनाने बळी घेतला. त्यानंतर २४ वर्षांच्या तरुणावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. हा तरुण पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्याच वेळी घरातील परिस्थिती बिघडली.
संयुक्त कुटुंबातील एकापाठोपाठ एक सदस्याची प्रकृती ढासळू लागली. त्याआधी वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी आईचा मृत्यू झाला. आता या तरुणांना मानसिक आधाराची गरज आहे.
कुटुंबाचा भार कुणावर
जळगाव तालुक्यातील एका कुटुंबात वडिलांचा मृत्यू झाला. त्याच वेळी घरातील मुलीचे लग्न ठरले होते. आता भावावरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली आहे. आता या मुलीचे लग्नदेखील ठरले आहे. त्यामुळे तिच्या लग्नाची जबाबदारी सामाजिक संस्थांनी उचलली आहे. लवकरच तिचे लग्न होईल. पण त्या लग्नात वधुपित्याची उणीव सर्वांना नक्कीच जाणवेल. आता या कुटुंबाचा भार कमी वयातच भावावर येऊन पडला आहे.
पुढे काय, हा प्रश्नच...
जळगाव शहरातील एका कुटुंबातील एका बालकाच्या वडिलांचा कोरोनाने बळी घेतला आहे. हा बालक १० वर्षांच्या आतील आहे. त्यामुळे आता परिवारात त्याच्याकडे बघणारे कोण, त्याला आईची माया देणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एक पालक गमावलेल्या बालकांचे समुपदेशन करण्याचा प्रस्ताव तसेच त्यांची चौकशी करण्याचे काम महिला व बालविकास विभागाकडे आहे.
९ बालकांचे छत्रच हिरावले
जिल्ह्यात ९ बालकांचे आई आणि वडील अशा दोन्हींना कोरोनाने हिरावून नेले आहे. त्यामुळे त्यांच्या पुढे भविष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यात रावेर तालुक्यातील दोन, चोपडा तालुक्यातील दोन, सावदा येथील दोन आणि जळगाव येथील एका बालकाचा समावेश आहे. त्यात १८ वर्षांवरील दोन, तर १८ वर्षांच्या आतील ७ बालकांचा समावेश आहे. जे १८ वर्षांवरील आहेत. त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे करिअर मार्गदर्शन देणे याचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा आढावा
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण
१४०६०४
बरे झालेले रुग्ण
१३४२२७
सध्या उपचार सुरू असलेले
३८२९
एकूण मृत
२५४८