काॅल करण्यासाठी मोबाइल घेतला अन् पळ काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:33+5:302021-06-03T04:12:33+5:30
तिघांना अटक : मदत करणे तरुणाला भोवले जळगाव : नातेवाइकाला एक कॉल करायचा आहे, असे सांगून रस्त्यावर मित्राची वाट ...
तिघांना अटक : मदत करणे तरुणाला भोवले
जळगाव : नातेवाइकाला एक कॉल करायचा आहे, असे सांगून रस्त्यावर मित्राची वाट पाहत असलेल्या सोहम गणेश कोष्टी (रा.जीवन नगर) या तरुणाजवळून मोबाइल घेत थोड्या अंतरावर जाऊन बोलत असतानाच पुढे थांबलेल्या दोघांच्या दुचाकीवर बसून पळून जाणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
मयूर ज्ञानेश्वर नन्नवरे (वय २०, रा.द्वारका नगर, जळगाव), रूपेश सुखदेव बाविस्कर (वय १९) व दत्ता आनंदा ढोणे (वय १९) दोन्ही रा. नेरी बु.ता.नजामनेर अशी संशयितांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोहम गणेश कोष्टी हा तरुण २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता आरटीओ कार्यालयाच्या बाजूला रस्त्यावर मित्र लोकेश माळी याची वाट पाहत उभा होता. त्यावेळी एक तरुण त्याच्याजवळ आला व मला नातेवाइकाला कॉल करायचा आहे, थोडा मोबाइल देतो का, म्हणून विनंती केली. सोहम याने मदत करण्याच्या भावनेतून त्याला मोबाइल दिला. संबंधित तरुणाने सोहमपासून काही अंतरावर जाऊन मोबाइलवर बोलण्याचे नाटक केले आणि पुढे थांबलेल्या दोघांच्या दुचाकीवर बसून पळून गेले होते. याप्रकरणी सोहमचे वडील गणेश रामदास कोष्टी यांनी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे हवालदार संजय सपकाळे, प्रवीण जगदाळे व सुशील चौधरी यांनी गुन्ह्याचा तपास करीत असताना मयूर नन्नवरे याने दोघांच्या मदतीने मोबाइल लांबविल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र वारुळे यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन इतर आरोपींना निष्पन्न केले. बुधवारी तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.