कभी जिंदगी मे सोचा नही ऐसा दिन देखना पडेगा... व्यथा स्थलांतरितांच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 04:51 PM2020-05-10T16:51:50+5:302020-05-10T16:53:12+5:30
जंक्शन शहरामध्ये पायपीट करत शेकडो मील पायी प्रवास करत शहरातून देशातील कोणत्याही कानाकोपºयात जाण्यासाठी रेल्वे मिळेल या आशेपोटी शेकडो परप्रांतीय भुसावळ शहरांमध्ये दाखल होत आहेत.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : जंक्शन शहरामध्ये पायपीट करत शेकडो मील पायी प्रवास करत शहरातून देशातील कोणत्याही कानाकोपºयात जाण्यासाठी रेल्वे मिळेल या आशेपोटी शेकडो परप्रांतीय भुसावळ शहरांमध्ये दाखल होत आहेत. मात्र प्रशासनातर्फे जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे हिरमोड झाल्यानंतर ‘कभी जिंदगी मे सोचा नही था ऐसा दिन देखना पडेगा’ अशी आप बीती मजुरांनी व्यक्त केली.
हजारो किलोमीटर घरदार सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आलेले परप्रांतीय लॉकडाऊननंतर मोठा अस्मानी संकट कोसळला. भुसावळ महामार्गावर नवोदय विद्यालयासमोर दररोज जथेच्या जथे थांबत असून या ठिकाणी त्यांची सेवाभावी संस्थेतर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यांच्याशी युती केली असता औरंगाबाद, नाशिक, धुळे यासह छोट्या तालुक्यांमध्ये यु.पी., एम.पी., झारखंडच्या वेगवेगळा जिल्ह्यातून अडकलेल्या मजुरांनी आपबिती सांगितली तर अक्षरश: अंगावर शहारे आले. डोंबिवली येथे एका खोलीमध्ये भाडे वाचावे व दोन पैसे शिल्लक राहावे तब्बल या हेतूने आम्ही ३९ लोक राहत होते. एकाच कंपनीत तीन शिफ्टमध्ये तेरा तेरा तास काम करत होतो. त्या खोलीची क्षमता एकाच वेळेस सर्वांना राहण्याची नव्हती. मात्र लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने आमच्यावर अस्मानी संकट कोसळले. इतक्या लोकांनी कसे राहायचे? कसं जेवायचं? काहीच समजायला मार्ग नाही. ज्या भागातही खोली होती त्या भागातल्या शेजारच्यांना आमच्या राहण्यावरून आपत्ती होती. जणू माणुसकीच हरवली की काय, असं आम्हाला जाणवला. घरमालकांना सांगून वारंवार तगादा लावून आम्हाला खोली खाली करण्यास सांगण्यात आले. आमच्याकडे शंकेच्या नजरेने पाहण्यात आले. खिशात पैसे नाही. हातात काम नाही. दोन पैसे कमावून घरी वृद्ध आईवडिलांची व कुटुंबीयांची सेवा करावी याकरिता हजारो किलोमीटर लांब येऊन मजुरी करत होते. मात्र तेही देवाला मंजूर नाही, अशी मनाला भेद करणारी प्रतिक्रिया डोंबिवली येथून आलेल्या रमेश लाल तिवारी यांनी ‘लोकमत'ला दिली.
कोणी माणुसकीच्या नात्याने जेवण दिले तर जेवायचे. अन्यथा उपाशी पोट प्रवास करायचा ह्या नित्याचे झाले आहे भुसावळ येथून जाण्यासाठी रेल्वे मिळेल या आशेपोटी इथे आले. मात्र काही उपयोग झाला नाही. रविवारी भरदुपारी एक वाजता भुसावळ महामार्गावर एका डेरेदार वृक्षाच्या सावलीचा आधार घेत थोडा विसावा घेतला. पहाटे चारपासून प्रवास करत सकाळी नऊ वाजेपर्यंत प्रवास हे नित्याचे झाले आहे. खानदेशमध्ये आल्यानंतर विशेषत: भुसावळमध्ये लोकांनी खूप भरभरून प्रेम दिले. जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था केली. मात्र उन्हाचे चटके भुसावळचे असह्य आहे. संध्याकाळी सहानंतर पुढील प्रवास करू, असे ते युवकाने सांगितले.
‘कोरोना समूहाने होतो. आम्ही तर निरंतर समूहाने चालत आहोत. आम्ही अनेक दिवसांपासून समुहात आहोत. आमच्या आरोग्याचे तर का सोडा, आमच्या जीवनाचे वांधे आहे. हमारा कौन है यहां जो मारी फिकर करेगा,’ अशी आप बीती परप्रांतीयांनी व्यक्त केली.
घर की मिट्टी मे मरना पसंद करेंगे
कोरोना महामारीमुळे कधी काय होईल सांगता येत नाही. मात्र शेवटची इच्छा अशी आहे की, आम्हाला आमच्या घरी आमच्या कुटुंबीयांमध्ये आलीस तर मरण यावे. हम घर कि मिट्टी मे जाके मरना पसंद करेंगे. अगर जिंदा रहे तो वही खेतीवाडी करके दो वक्त की रोटी कमा लेंगे.
साकेगाव नदीत करतात आंघोळ
महामार्गावर साकेगावजवळ असलेल्या वाघूर नदीवर पायी जाणारे मजूर तसेच परवानगी मिळाल्यानंतर वाहनाने जाणारे परप्रांतीय अडकलेले मजूर सकाळ, संध्याकाळ मोठ्या संख्येने थांबून आंघोळ करून विसावा घेत आहेत.