परिस्थितीनं लिहितं केलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:22 PM2018-05-13T17:22:39+5:302018-05-16T01:06:08+5:30

माझी लेखन प्रेरणा

 I wrote the situation | परिस्थितीनं लिहितं केलं

परिस्थितीनं लिहितं केलं

Next

स्वप्नरंजनात कल्पनांच्या भराऱ्या अधिक असतात. मात्र स्वानुभावाच्या भट्टीत जे तावून-सुलाखून येतं; त्या लेखनाचा बाज वेगळा आणि जोरकस असतो. घरात लेखनाची परंपरा नसली तरी, परिस्थितीनं संघर्ष करण्याबरोबरच मन:पटलावर गोंधलेलं कागदावर उतरवण्याचं वळण लावलं. मी लिहित गेलो. समृद्ध होणं मात्र अजूनही सुरुच आहे.
चौथीची परीक्षा पास झालो. त्याच वर्षी वडिलांनी चाळीसगाव येथील कापड गिरणीतील कामगाराच्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली. वर्ष होतं १९८४. बसस्थानकात ओरडून वर्तमानपत्र विकण्याचं काम सुरू केलं. पुढे घरोघरी वर्तमानपत्रं टाकण्याचं काम मिळालं. यातूनच पहाटे रेल्वे स्थानकावर जाऊन वर्तमानपत्रांचे गठ्ठे उतरवणं, पुरवण्या टाकणं अशी कामंही सुरू झाली. वर्तमानपत्रांचं आकर्षण निर्माण झालं. वाचनाचा छंदही जडला.
कधी-कधी वर्तमानपत्रांच्या दोन-चार पुरवण्या जादा येत. त्या घरी आणून त्यांचं वाचन करू लागलो. शाळा आणि वर्तमानपत्र वाटण्याचं काम. माझ्या आयुष्याची सायकल अशा दोन चाकांवर सुखेनैव फिरत होती. याच दरम्यान चाळीसगावातील शेठ ना.बं. वाचनालयाशी परिचय झाला. महाविद्यालयात गेल्यावर ग्रंथालयाचं मोठं दालन पाहून हरखून गेलो. पुस्तके खुणावू लागली. पूर्ण रविवार 'वाचू आनंदे' असा सत्कारणी लागायचा. कालौघात शिक्षकी पेशात रुजलो. दरदिवशी दोन तास वाचनाचं वेळापत्रकच तयार केलं. हा शिरस्ता आजही कायम आहे. राज्यभरातील आघाडीची वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आणि नियतकालिकांमधून कविता व लेखातून व्यक्त होऊ लागलो. नामवंत दिवाळी अंकांमधून साहित्याची हजेरी लागली. पत्रकारिता क्षेत्राबद्दल आकर्षण होतं. मेहनतीनं आणि सरावानं यातही प्रवेश केला. पत्रकारितेत उमविमध्ये एम.ए. पूर्ण केले. चार काव्यसंग्रहांचं प्रकाशन झालं. मान्यवरांसाठी दिडशेहून अधिक मानपत्रंही लिहिली आहेत. स्मरणिका, गौरवग्रंथांचं संपादन करण्याची संधी मिळाली. पत्रकारितेमुळे लेखनाला आटोपशीर करण्याचा संस्कार मिळाला. लेखन वारी सुरुच असली तरी त्याचं रिंगणही पूर्ण व्हावं, हे ध्येय घेऊनच आयुष्य पादाक्रांत करतोय. आयुष्यात हे ध्येय पूर्ण होईल, अशी आशा आहे.
- जिजाबराव वाघ

Web Title:  I wrote the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.