आयसीएमआरचे पथक संकलित करणार चारशे जणांचे रक्तनमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:13 PM2020-05-21T12:13:56+5:302020-05-21T12:14:13+5:30
चेन्नईला होणार संशोधन : दहा पथकांचे आज दहा ठिकाणी सर्व्हेक्षण
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग किती प्रमाणात आहे, कोणाला कोरोना होऊन गेलेला आहे का, त्यांच्या प्रतिकार क्षमता किती विकसित झाली आहे़, या सर्व बाबींच्या तपासणीसाठी आयसीएमआरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पंधरा जणांचे पथक गुरूवारी जिल्हाभरात सर्व्हेक्षण करणार आहे़ हे पथक बुधवारीच जिल्ह्यात दाखल झाले. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली दहा पथके जिल्ह्यातील दहा ठिकाणाहून प्रत्येकी चाळीस अशा चारशे जणांचे रक्तनमुने घेणार आहेत़ यावर चेन्नई येथे संशोधन होणार आहे.
आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत कोविडच्या पार्श्वभूमीवर नॅशनल सेरो सर्व्हे केला जाणार सहा जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे होणार आहे़ आयसीएमआरचे पथक हा सर्व्हे करणार आहे़ दरम्यान, आरोग्य संचालकांनी आधिच सर्व आढावा घेतला असल्याने पथकाकडून थेट सर्व्हेक्षणाचेच काम होणार असल्याची माहिती आहे़
यांचा आहे समावेश
जागतिक आरोग्य संघटनेचे समुपदेशक, आयसीएमआर (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंशोधन परिषद) यांचे वैद्यकीय अधिकारी त्यांच्यासह तंत्रज्ञ यांचा पथकात समावेश राहणार असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ यासह दहा ठिकाणचे दहा वैद्यकीय अधिकारी व स्थानिक दहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा पथकांमध्ये समावेश राहणार आहे़
चैन्नईला होणार तपासणी
रक्तनमुने संकलीत केल्यानंतर एक दोन दिवस स्थानिक रुग्णालयात सर्व प्रक्रिया करून मग हे सर्व नमुने चैन्नई येथे प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी पाठविण्यात येणार आहे़ ही अॅन्टीबॉडी टेस्ट असणार आहे़ कोरोनाचा संसर्ग कोणाला झाला होता़ प्रतिकारशक्ती कशी आहे़ अशा काही तपासण्या यातून होणार आहे़ कोणाला कोरोना होऊन गेला आहे का? याचीही माहिती यातून समोर येणार आहे़ चैन्नईला यावर संशोधन होणार आहे़ अॅन्टीबॉडी कोणात तयार झाल्या आहेत, यावर तपासणी होऊन त्याचे अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे येणार आहे़
जिल्ह्यात झपाट्याने फैलाव
जिल्हाभरात कोरोना संसर्गाचा झपाट्याने फैलाव झाला असून एप्रिल अखेर व मेच्या आधिच्या आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णांनी दोनशेचा आकडा पार केला होता़ रोज दहाच्यावरच रुग्ण आढळून येत आहेत़ त्यातच बुधवारी दिवसभरात २९ रुग्ण आढळून आल्याने ३४६ रुग्ण संख्या झाली आहे़ दुसरीकडे मृतांचा आकडाही चिंता वाढविणार आहे़ जिल्हाभरात बुधवारी सायंकाळपर्यंत ३८ जणांचा मृत्यू झालेला होता़ यातील अनेकांचे मृत्यूनंतर अहवाल प्राप्त झाले आहे़
या ठिकाणी जाणार पथक
यावल तालुक्यातील मोहराळे, रावेर तालुक्यातील तांदलवाडी, जळगाव तालुक्यातील कडगाव, धरणगाव, भडगाव तालुक्यातील वरखेडे, पाचोरा येथील नाईकनगर, जामनेर येथील गोराडखेडा, भुसावळ येथील वॉर्ड नं ४५, जळगाव येथील वॉर्ड नं ५७, चाळीसगाव येथील वॉर्ड नं २८ या ठिकाणच्या रँडमली दहा घरंची निवड करून प्रत्येकी चार अशा चाळीस जणांची प्रत्येक गावातून तपासणी केली जाणार आहे़ पंधरा दिवसानंतर पुन्हा तपासणी घेण्यात येणार आह़े त्यानंतर महिन्याच्या अंतराने ही तपासणी होणार असल्याची माहिती आहे़
बरे होणाºयांचे प्रमाण समाधानकारक
रुग्ण संख्या वाढत असली तरी कोरोनातून बरे होणाºयांचे प्रमाणही समाधानकारक असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे़ बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील १३४ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे़ दहा दिवसांच्या नियमानुसार लक्षणे नसलेल्याना घरी सोडण्यात येत आहे़ त्यात या रुग्णांचा समावेश आहे़
पथक बुधवारीच जिल्ह्यात दाखल झाले असून गुरूवार व शुक्रवार असे दोन दिवस जिल्ह्यात दहा ठिकाणी सर्व्हे करणार आहे़ त्यांच्यासोबत स्थानिक वैद्यकीय अधिकारी, स्थानिक आरोग्य कर्मचारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ राहणार आहे़ दहा पथके हा सर्व्हे करणार आहेत़ रक्तनमुने घेऊन त्यावर चैन्नई येथे संशोधन होणार आहे़
-डॉ़ एऩ एस़ चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक