‘व्हॉट्सॲप’वरून पटली मृतदेहाची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:12 AM2021-04-03T04:12:47+5:302021-04-03T04:12:47+5:30
फोटो : २.४१ वाजेचा मेल आहे, सागर दुबे नावाने लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मेहरूण तलावात एका अज्ञात ...
फोटो : २.४१ वाजेचा मेल आहे, सागर दुबे नावाने
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मेहरूण तलावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली होती. अखेर त्या अज्ञात तरुणाची ओळख पटली असून, कैलास प्रकाश सोनवणे (३०, रा. फुले मार्केट, जळगाव) असे मयताचे नाव आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या मृतदेहाची ओळख पटली आहे.
मेहरूण तलावात बुधवारी सायंकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला होता. नंतर या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटावी म्हणून विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर त्याचा फोटो शेअर केला. गुरुवारी रात्री मृत व्यक्तीचे नातेवाईक अक्षय शिंदे व गोलू पवार यांना व्हॉट्सॲपवर फोटा दिसल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. नंतर मृताची ओळख पटविली. मृत तरुणाचे नाव कैलास प्रकाश सोनवणे असे असल्याचे समोर आले.
रसवंतीवर करायचा काम
कैलास हा जळगाव शहरात कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. नंतर कल्याण येथे तो सात ते आठ वर्षे राहिला. मात्र, गेल्या दीड वर्षापासून फुले मार्केटमधील एका रसवंतीवर काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा. तर रसवंतीच्या एका खोलीतच तो राहत असे. त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुले असून ते कल्याण येथे राहत असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात
मृताची ओळख पटल्यानंतर शुक्रवारी सकाळी नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, ही आत्महत्या असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय अमोल मोरे व हेमंत पाटील करीत आहेत.