जळगावात अनोळखी मयताची ओळख पटवून १८ हजार रुपये केले नातेवाईकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:23 PM2018-11-04T12:23:05+5:302018-11-04T12:24:14+5:30
अधिकारी, परिचारिका, कर्मचाऱ्यांचा पुढाकार
जळगाव : गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या अनोळखी वृद्धाच्या मृत्यूनंतर त्याची ओळख पटली. यावेळी १८ हजार रुपये संबंधित वृद्धाच्या नातेवाईकांच्या ताब्यात देत प्रामाणिकपणाचे दर्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिकारी, कर्मचा-यांनी घडविले.
रेल्वेचे सहायक फौजदार किशोर वाघ यांनी भुसावळ येथे प्रकृती खालावलेल्या गजमल साधू पाटील (७५, रा. अमरावती) या वृद्धास २९ आॅक्टोबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. या वेळी वृद्धाजवळ रोख १८ हजार रुपये होते. त्यात उपचारादरम्यान १ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर किशोर वाघ यांच्यासह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे, कर्मचारी संदीप बागूल तसेच प्रमोद झंवर यांनी वृद्धाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले. यादरम्यान परिचारिका मालू वानखेडे, सरला वडार, शामल चौधरी, कर्मचारी अशोक आजवे, नितीन जगताप यांनी अनोळखी रुग्णाच्या उपचारासाठी पुढाकार घेत त्याच्या ओळखीसाठीही संपर्क साधले.
अखेर वृद्धाची ओळख पटली व ते अमरावती येथील असल्याचे समजले. त्या वेळी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. ३ रोजी वृद्धाचे नातेवाईक रतीलाल गंभीर पाटील हे जळगावात आले व त्यांच्याकडे अधिकारी व कर्मचाºयांनी रोख १८ हजार रुपये सुपूर्द केले तसेच मृतदेहदेखील ताब्यात देण्यात आला.