शिवाजीनगर पूल बंद करण्यास विरोध असेल तर मनपाने पर्यायी मार्गाचा खर्चही द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:41 PM2018-03-06T16:41:18+5:302018-03-06T16:41:18+5:30
रेल्वेची भूमिका
जळगाव: ज्या १०० वर्ष जुन्या शिवाजीनगर पुलाच्या कामाचा १०० टक्के खर्च करण्याची जबाबदारी मनपाची होती. त्याचा खर्च रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग उचलत असताना व त्यासाठी ना-हरकत दिल्यानंतर मनपा आता पर्यायी मार्ग द्या, मगच जुना पूल तोडा अशी घुमजाव करणारी भूमिका घेत आहे. परिणामी निविदा प्रक्रिया होऊन व ठेकेदाराला कार्यादेश देऊनही जुना पूल पाडण्याच्या कामास सुरूवात होऊ शकलेली नाही. त्यामुळे मनपाने त्वरीत पूल बंद करून तो पाडण्याची परवानगी द्यावी अथवा पर्यायी मार्गाचा खर्च द्यावा, अशी भूमिका रेल्वेने घेतली आहे.
शिवाजीनगर उड्डाणपूल १०० वर्षांहून अधिक जुना असल्याने जीर्ण झाला असल्याने या पुलावरील अवजड वाहनांना यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. आता ही गैरसोय दूर व्हावी यासाठी त्या जागी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन कंत्राटही देण्यात आले व होळीनंतर (१ मार्चपासून) जुना पूल तोडण्यास सुरुवात होणार होती. वास्तविक शहरातील रस्त्यावर हा पूल असल्याने त्याचा खर्च मनपाने करणे अपेक्षित होते, मात्र मनपाची आर्थिक परिस्थिती नसल्याने तसेच रेल्वेलाही तिसरी व चौथी लाईन टाकायची असल्याने नवीन पूल होणे आवश्यक होते. त्यामुळे रेल्वेने पुढाकार घेऊन त्यांच्या हद्दीतील पूलाचे काम करण्याची तयारी दर्शविली. तर त्याला जोडणाºया रस्त्यांचे काम मनपाने केलेल्या मागणीनुसारच सार्वजनिक बांधकाम विभागाने हा खर्च उचलण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. त्यासाठी मनपानेच ना-हरकत दिली. मात्र हा पूल पाडल्यास असलेल्या पर्यायी मार्गावरून नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे कारण पुढे करीत आता पूल तोडण्यास मनपाच नकार देत असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दूधफेडरेशनकडील रस्त्याचा पर्याय
शिवाजीनगर व रेल्वे रूळापलिकडील नागरिकांना शिवाजीनगर पूल बंद झाल्यावर दूध फेडरेशनकडील रस्त्याचाच पर्याय राहणार आहे. अनेक भागांना तो रस्ता लांबचा असला तरीही कायमस्वरूपी सोय होण्यासाठी काही दिवस गैरसोय सहन करावी लागणार आहे.
राजकारण घुसले
शहरातील विकास कामांमध्ये तरी निदान राजकारण शिरू नये अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना हा पूल बंद केल्यास ये-जा करण्यास गैरसोय होईल. दूधफेडरेशनकडील रस्ता लांब पडेल असे सांगत पूलावरील वाहतूक बंद करण्यास विरोध केला जात आहे. मनपात याबाबत झालेल्या चर्चेनंतर मनपाच्या शहर अभियंत्यांनी पर्यायी रस्ता दिल्याशिवाय पूल बंद करू नये, असे पत्रच रेल्वेला दिल्याने काम सुरू होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. लोकांची गैरसोय होईल, या विषयाचे भांडवल करीत या विषयात राजकारण केले जात असल्याची टीका आता होत आहे. जर नवीन पूल हवा असेल व त्यामुळे रेल्वेलाईनच्या पलिकडील भाग शहराशी अधिक रूंद पुलाने जोडला जाणार असेल तर काही दिवस गैरसोय सहन करावीच लागणार आहे. अन्यथा उड्डाणपुलाचे काम रखडले तर जीर्ण झालेला पूल कधीही कोसळून त्याचे खापर मनपाच्या माथीच फुटणार आहे.
पर्यायी रस्त्याची मागणी बालिशपणाची
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करून तो पाडायला सुरूवात करण्यापूर्वी रेल्वेने पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करणेच बालिशपणाचे आहे. कारण शिवाजीनगर पूल असलेल्या परिसरात पर्यायी रस्त्यासाठी जागाच नाही. तसेच भुयारी मार्ग करायचा तरी त्यासाठी ६-७ कोटींचा निधी व किमान दीड वर्षांचा कालावधी लागेल. तोपर्यंत शिवाजीनगर पुलावरून वाहतूक सुरू ठेवणे नागरिकांच्याच जिवाशी खेळ ठरणार आहे. त्यामुळे मनपाची ही मागणी बालिशपणाची आहे.