मागण्या मान्य न झाल्यास बारावी परीक्षेवर बहिष्कार, प्राध्यापकांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:19 PM2017-12-20T13:19:51+5:302017-12-20T13:22:32+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 20- आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी 19 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यासह बेमुदत बंद व बारावी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने देण्यात आला.
1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत असलेल्या कनिष्ठ प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी तसेच इतर मागण्यांसंदर्भात 3 ते 4 वर्षापासून निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ 19 रोजी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सकाळी प्रथम सभा झाली. यामध्ये माजी अध्यक्ष प्रा. डी.डी. पाटील, प्रा. विकास पाटील, सचिव प्रा. नंदन वळींकार, प्रा. सुनील गरुड, प्रा. सुनील सोनार आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. या वेळी प्राध्यापक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मागण्या मान्य झाल्यास 18 जानेवारी 2018 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येऊन 2 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद पुकारण्यात येईल व बारावी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.