धनगर समाजास आरक्षण न मिळाल्यास सरकारला खाली खेचू - गोपीचंद पडळकर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 04:57 PM2019-01-06T16:57:57+5:302019-01-06T21:08:52+5:30

अमळनेर येथे महाएल्गार मेळावा

 If Dharanagar community gets reservation, pull it down to government - Gopichand Padalkar's warning | धनगर समाजास आरक्षण न मिळाल्यास सरकारला खाली खेचू - गोपीचंद पडळकर यांचा इशारा

धनगर समाजास आरक्षण न मिळाल्यास सरकारला खाली खेचू - गोपीचंद पडळकर यांचा इशारा

Next

अमळनेर, जि. जळगाव : धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घरातील सत्ताधारी आमदारांचे छायाचित्र काढून फेका असे आवाहन करत महिन्याभरात धनगरांना एस.टी. प्रवर्गाचा दाखला मिळाला नाही तर केंद्रातील व राज्यातील सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी अमळनेर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि समाजाच्या मेळाव्यासाठी आयोजित महाएल्गार मेळाव्यात केले
ग. स. हायस्कूलमध्ये रविवारी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील होत्या . दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर, शिवदास बिडकर यांचे हेलिकॉप्टरने प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन झाले. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पिवळे झेंडे बांधलेल्या मोटारसायकल रॅलीने स्वागत केले. तेथून सर्व अतिथींच्या उपस्थितीत बसस्थानकाजवळ न.पा. ने बांधून दिलेल्या अहिल्याबाई होळकर स्मारकाचे लोकार्पण झाले. त्यांनतर ग. स. हायस्कूलमध्ये अहिल्याबाई व थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सभेला सुरुवात झाली. व्यासपीठावर गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र लांडगे, शिवदास बिडकर, माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते, नितीन निळे, डी. ए. धनगर, समाधान धनगर, हरचंद लांडगे, जिभाऊ कंखरे, विलास लांडगे, सदाशिवराव ढेकळे, धनराज कंखरे, विक्रांत पाटील उपस्थित होते
पडळकर पुढे म्हणाले की, घरातील नेत्याचे छायाचित्र गर्भवती महिलेने पाहिला आणि तो नेता भ्रष्टाचारी किंवा चोर असेल तर तुमचा मुलगाही चोर आणि खोटारडा निघू शकतो, अशा शब्दात नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी राजकारणात प्रगल्भ व्हायचे आहे. सर्व काही राजकारणातून घडते, त्यामुळे राजकारण करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. धनगरांच्या जीवावर राजकारण करणारे उपेक्षा करीत असून आता आपल्याला सत्तेत भागीदारी पाहिजे. आपल्या राज्यात जनावरांची संख्या मोजली जाते माणसांची नव्हे, असेही ते म्हणाले. ‘जितनी जिसकी संख्या भारी उसकी उतनी मक्तेदारी’ या तत्वावर आरक्षण मिळाले पाहिजे, असे म्हणत हुजरेगिरी करू नका लढाई लढा, राज्यात २५० घराणी प्रस्थापित असून ती नेस्तनाबूत करायची आहेत, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. राज्यकर्ते आमच्या हिताचे बोलले नाहीत तर त्यांच्या वाटेत काटे पेरल्याशिवाय राहणार नाहीत अशा इशारा देत तुम्ही फक्त ७ दिवस द्या महाड ते मुंबई मोर्चात मुले, बाळे कुटुंबासह जनावरे , मेंढ्या घेऊन हजर राहा, तुम्हाला एस. टी. प्रवर्गाचा दाखला मिळवून देतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आदिवासींशी आपली लढाई नाही
आदिवासींशी आपली लढाई नाही, आपल्याला भीक मागून नाही तर अधिकार हिसकावून घाययचा आहे, असे आवाहन करून ते म्हणाले की अमळनेरचे स्मारक बहुजनासाठी प्रेरक व आदर्श ठरणार आहे.
प्रास्ताविक डी. ए. धनगर यांनी केले. त्यात ते म्हणाले की, या मेळाव्यातून सरकारला २०१९च्या निवडणुकीची जाणीव करून सरकारला इशारा द्यायचा आहे.
कार्यक्रमास दशरथ लांडगे, प्रभाकर लांडगे, विलास लांडगे, श्रावण तेले, प्रदीप कंखरे, आधार धनगर, निरंजन पेंढारकर, गोपाळ हडपे, दीपक चौगुले, जिभाऊ कंखरे, प्रा. सुनील निळे, विजय लांडगे, अनिल भालेराव, आदी पदाधिकाऱ्यांसह खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार येथून धनगर समाजाचे कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले व आभार मानले.
अनिल गोटे यांच्या अन्यायाचा वचपा काढू
भाजपने अनिल गोटे यांच्यावर अत्याचार करून स्वत:चे थडगे उघडून ठेवले आहे. अनिल गोटे यांच्या अन्यायाचा वचपा राज्यात सर्वत्र मतदानाच्या माध्यमातून काढू, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी मार्गदर्शन करताना दिला.
सरकारने फसवणूक केली
या वेळी मार्गदर्शन करताना उत्तमराव जानकर म्हणाले की, हा अखेरचा लढा आहे, आता निर्णय घेऊनच थांबायचे आहे. राज्यातील भाजप व सहकारी ९१ आमदारांच्या मतदार संघात त्यांना सत्तेतून खाली गाडण्यासाठी या सभा घेतल्या जात आहेत. सरकारने फसवणूक करून अंदाजित लोकसंख्येच्या आधारे एन. टी.चे आरक्षण दिले असल्याचे ते म्हणाले.

Web Title:  If Dharanagar community gets reservation, pull it down to government - Gopichand Padalkar's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.