बँकांच्या गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळल्यास आॅडीटरवरही होणार कारवाई - प्रफुल्ल छाजेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:54 PM2019-12-11T12:54:14+5:302019-12-11T12:54:53+5:30
सहकारी बँकांचे राज्यस्तरीय चर्चासत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन
जळगाव : देशातील काही बँकांमधील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकार समोर येऊ लागल्याचा अनुभव पाहता सहकारी बँकांच्याही व्यवहारांची बारकाईने तपासणी होणार असून यात लेखा परीक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे लेखापरीक्षक, सीए यांनी आपापली जबाबदारी काळजीपूर्वक पूर्ण करावी, असा सल्ला द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटस् आॅफ इंडियाचे अध्यक्ष सी.ए. प्रफुल्ल छाजेड यांनी दिला.
जळगाव जनता सहकारी बँक व सहकार भारती यांच्या संयुक्तविद्यमाने मंगळवारी सहकारी बँकांसाठी राज्यस्तरीय चर्चासत्र झाले, त्या वेळी ते बोलत होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वालन करून चर्चासत्राचे उद््घाटन झाले.
प्रास्ताविक सहकार भारतीचे अखिल भारतीय बँकिंग प्रकोष्ठ प्रमुख संजय बिर्ला यांनी केले. जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सहकार हा विचार रुजविणे नाही तर वाढविणे हा हेतू डोळ््यासमोर ठेवून सहकार चळवळ पुढे नेण्याचे आवाहन केले.
बँक संचालकांसोबत सीएंवरदेखील मोठी जबाबदारी
आर्थिक संस्था व सीए यांचे सुरुवातीपासून जवळचे नाते आहे, मात्र आर्थिक संस्थांमधील काही घटनांमुळे हे नाते वेगळे आहे का?, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळेच आर्थिक संस्था, कंपन्यांसोबत आता सीएंचे नावदेखील पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे बँक संचालकांसोबत सीएंवरदेखील मोठी जबाबदारी येत असल्याचे प्रफुल्ल छाजेड यांनी नमूद केले. बँकांमधील गैरव्यवहार पाहता बँकांच्या लेखा परीक्षकांसाठी प्रशिक्षण सक्तीचे करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी त्यांनी बँकांचे लेखा परीक्षण करताना दक्षता घेण्याविषयी विविध मुद्यांवर माहिती दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक व सहकार भारतीचे संरक्षक सतीश मराठे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन जनता बँकेचे संचालक कृष्णा कामठे यांनी केले तर नितीन झवर यांनी आभार मानले.
दिवसभर विविध सत्र
उद््घाटनानंतर दिवसभर सहकारी बँकांसंबंधी बदलती आव्हाने पेलण्यासाठी सद्य परिस्थितीतील जोखीम व्यवस्थापन, व्यावसायिक धोरणे, क्षमता व विकास अशा विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
समारोप सत्रात सहकार भारतीचे सरचिटणीस डॉ. उदय जोशी यांनी सहकारी बँकांच्या विकासासाठी सहकार भारती पाठिशी उभी असल्याची ग्वाही दिली. अनिल राव यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगून अशा चर्चासत्रांसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. विविध सत्रांचे सूत्रसंचालन स्वाती भावसार यांनी केले तर जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील यांनी आभार मानले.
या वेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे प्रकल्प प्रमुख भरत अमळकर, दलुभाऊ जैन, भालचंद्र पाटील, सीए प्रकाश पाठक, सी.ए. असोसिएशनच्या जळगाव शाखेच्या अध्यक्षा स्मिता बाफना, माजी अध्यक्षा पल्लवी मयूर यांच्यासह ३६ सहकारी बँकांचे प्रतिनिधी, सीए मोठ्या संख्येने उपस्थित होते.