बीएचआरमध्ये दोषी आढळल्यास` त्या ` सीए’ वरही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:11+5:302021-01-23T04:16:11+5:30
जळगाव : प्रत्येक क्षेत्रामध्ये जे नियम असतात, शिस्तपालन असते, तशी शिस्त इंडियन चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इन्स्टिट्यूट (आयसीएआय) मध्येही ...
जळगाव : प्रत्येक क्षेत्रामध्ये जे नियम असतात, शिस्तपालन असते, तशी शिस्त इंडियन चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इन्स्टिट्यूट (आयसीएआय) मध्येही आहे. बीएचआर प्रकरणात जळगावातील ज्या दोन सीएंवर आरोप झाले आहेत, त्यांना न्यायालयाने अद्याप दोषी ठरविलेले नाही. त्यांना अजून आपली बाजू मांडायची बाकी आहे. जर या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले, तरच त्यांच्यावरही आयसीएआयतर्फे काम थांबविण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती इंडियन चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इन्स्टिट्यूटचे पश्चिम विभागाचे चेअरमन सीए ललित बजाज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षाप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पाबाबत सरकारकडून देशपातळीवर काम करणाऱ्या दिल्ली सीए असोसिएशनतर्फे मते मागविण्यात आली होती. कोरोना काळात ढासळलेल्या अर्थ व्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारकडून सुरूवातीपासूनच अतिशय चांगले काम करण्यात येत असून, येत्या अर्थसंकल्पातही सरकारकडून सर्व घटकांसाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असल्याचे मतही ललित बजाज यांनी यावेळी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला आयसीएआयचे पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष सीए विशाल दोषी, सचिव सीए मुर्तूजा कातवाला, सीए उमेश शर्मा, सीए जयेश काला, जळगाव सीए असोसिएशनचे चेअरमन सागर पटनी, कोषाध्यक्ष सौरभ लोढा, माजी अध्यक्ष स्मिता बाफना, विक्की बिर्ला, श्रेय कोठारी उपस्थित होते. आयसीएआय पश्चिम विभागाचे पदाधिकारी शुक्रवारी जळगाव शाखेला वार्षिक भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
इन्फो :
कोरोना काळातही अविरत काम
सीए ललित बजाज यांनी सांगितले, कोरोना काळात आयसीएआयचे काम थांबले नसून, अविरत सुरू होते. कोरोनामुळे सर्व दिवस ऑनलाईन कामकाज व सेमिनार घेतले. सरकारचे जे नवीन कायदे आहेत, धोरणे आहेत, याविषयी विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून सांगण्यात येत होते. तसेच सीएच्या अभ्यासक्रमांत कुठलेही बदल झाले नसल्याचेही बजाज यांनी सांगितले.