ती तरुणी मनोरुग्ण तर रुग्णालयात दाखल का केले नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:16 AM2021-03-05T04:16:27+5:302021-03-05T04:16:27+5:30
जळगाव : शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावल्याच्या प्रकरणाची तक्रार समोर आल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर ...
जळगाव : शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावल्याच्या प्रकरणाची तक्रार समोर आल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आणणाऱ्या तरुणीला संस्था अर्थात प्रशासनाने मनोरुग्ण ठरविण्याचा प्रयत्न केला आहे, ही तरुणी खरच मनोरुग्ण आहे तर तिला रुग्णालयात का दाखल केले नाही? असा प्रश्न यानिमित्ताने आता पुढे येऊ लागले आहेत. दरम्यान, संस्थेवर सदस्य नियुक्तीच्याही वादाची किनार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्थेच्या एका महिला कर्मचाऱ्यानेच मुलीला कपडे काढून नृत्य करायला लावल्याच्या मुद्यावर ही तरुणी आजही ठाम आहे. बुधवारी तिने पत्रकारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला बोलण्यापासून रोखण्यात आले. ही तरुणी डिसेंबरपासून संस्थेत दाखल असल्याची माहिती मिळाली. तीन महिन्यात ही मुलगी कधीच मनोरुग्ण वाटली नाही, वाटली तर तिच्यावर उपचार किंवा रुग्णालयात का दाखल करण्यात आले नाही? हा प्रश्न कायम आहे. गुरुवारी संस्थेत तीन पुरुष पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते.
गृहमंत्र्यांनी दिली सांस्कृतिक कार्यक्रमांची कबुली
आशादीप महिला वसतीगृहात सांगण्यात येत असलेला प्रकार घडलाच नसल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले, याच वेळी त्यांनी असेही सांगितले की वसतीगृहात काही दिवसापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता तेव्हा गरबा नृत्य व गाण्यांचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा त्रास होत असल्याने एका मुलीने झगा उतरविला होता अशी कबुलीही त्यांनी दिली. पोलिसांकडून महिलांना नग्न नाचविण्यात आल्याची तक्रार खोटी असल्याचेही गृहमंत्र्यांनी जाहीर केले.
५ गर्भवती मुलींना का हलविले ?
ज्या दिवशी हा गोंधळ झाला, त्याच दिवशी सायंकाळी तक्रारदार महिलेने गर्भवती मुलींना मारहाण केल्याचा दावा वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनीच केला व त्यानंतर या मुलींना निरीक्षणगृहात हलविण्यात आल्याचेही रंजना झोपे यांनी सांगितले होते. महिलांच्या वसतीगृहात गर्भवती मुलींना ठेवण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सदस्य काल चार होते, आज सहा जाहीर झाले?
चौकशी समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे, महिला उपनिरीक्षक कांचन काळे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.कांचन चव्हाण व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे या चार महिला अधिकार्यांचा समावेश आहे. मात्र विधानसभेत निवेदन देतांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहा सदस्यांची समिती चौकशी करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे समिती नेमकी चार सदस्यांची की सहा सदस्यांची असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजप विरोधात महाविकास आघाडीने दिले निवेदन
या प्रकरणामुळे राज्यात जळगाव जिल्ह्याची बदनामी होत आहे. प्रकरणाची सत्यता तपासणी करूनच भाजपाने हा विषय विधीमंडळात मांडायला हवा होता. भाजपाने राजकारण केल्याचा आरोप करणारे निवेदन महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जळगावचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना दिले.
तक्रार करणार्या संघटनेने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
या प्रकरणाची तक्रार करणारे जननायक फांउडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी व सहकाऱ्यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम कथन केला. तरुणीने जी तक्रार केली त्याविषयी देखील त्यांनी माहिती दिली. बुधवारी गुप्तचर यंत्रणा, सीआयडीनेही तसेच चौकशी समितीनेही जबाब नोंदविले.