स्व.गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यासारख्या निष्ठावंतांवर अन्याय झाला नसता : एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 07:54 PM2019-12-11T19:54:09+5:302019-12-11T19:59:17+5:30
बहुजन समाजात भारतीय जनता पक्ष पोहोचविण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कार्य फार मोठे होते. आज ते नसल्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ते असते तर आमच्या सारख्या निष्ठावानांवर अन्याय झाला नसता अशी भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : बहुजन समाजात भारतीय जनता पक्ष पोहोचविण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कार्य फार मोठे होते. आज ते नसल्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ते असते तर आमच्या सारख्या निष्ठावानांवर अन्याय झाला नसता अशी भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या निमंत्रणानुसार बुधवारी बीड येथील गोपीनाथ गडाकडे रवाना झाले. आपण दरवर्षी गोपीनाथ गडावर जात असून गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेला जिव्हाळा त्यांच्या निधनानंतरदेखील कायम असल्याचे सांगत मुंडे गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतरदेखील त्यांचे महत्त्व कमी झाले नाही. त्यांच्या कार्याबाबत नेहमी चर्चा समाजात व राजकारणात केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
तर युती कायम राहिली असती
स्व.मुंडे हे जिवंत असते तर महाराष्ट्रात शिवसेना व भाजपची युती कायम राहिली असती व भाजपची स्थिती कितीतरी पटीने चांगली राहिली असती. भाजप व शिवसेना यांच्यात समन्वयकाची भुमिका नेहमी त्यांनी घेतली होती. भाजप व शिवसेनेसोबतच त्यांचे अन्य पक्षातही चांगले संबध होते. त्यामुळे त्यांनी टाकलेला शब्द देखील विरोधक अडवित नसत. एखादी चुक झाल्यानंतर उदार मनाने ती मान्य करण्याचा मोठा गुण त्यांच्याकडे होता. एखादी चूक पक्षाच्या ठिकाणी झाल्यास ते खुल्या मनाने मान्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सेना-भाजप जे काही वाद असायचे ते तात्काळ सोडवण्याचे काम गोपीनाथ मुंडे हे करत असत. लोकनेते असल्याने त्यांनी नेहमी कार्यकर्त्यांना मोठे केल. दरवर्षी आपण गोपीनाथ गडाकडे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.