फेसबुक, इंस्टाग्राम हाताळताय तर मग सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:33+5:302021-06-06T04:12:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम हाताळत असाल तर सावधान.... तुमच्या नावाने बनावट खाते तयार करून ओळखीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम हाताळत असाल तर सावधान.... तुमच्या नावाने बनावट खाते तयार करून ओळखीच्या लोकांकडे पैशांची मागणी होऊ शकते... त्याशिवाय महिला व तरुणीच्या जाळ्यात तुम्ही अडकू शकतात. फेसबुक व इंस्टाग्रामवर मैत्री करुन समोरील महिला व तरुणी अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात अनेक जण याला बळी पडलेले आहेत, त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पोलिसांकडे वर्षभरात शेकडो जणांनी आपल्याला आलेले अनुभव सांगितले तर काहींनी तक्रारी केलेल्या आहेत. आता गेल्या पंधरा दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
पोलिसांनी तात्काळ खाते केले बंद
गेल्या पंधरा दिवसात घाबरलेल्या खातेदारांनी सायबर पोलिसांकडे धाव घेऊ झालेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी या नागरिकांचे जागेवरच त्यांच्या मोबाईलवरून बनावट खाते डिलीट केले. त्यानंतर त्यांच्या प्रोफाईल बंद करण्यात आल्या आहेत. खाते बंद झाल्यामुळे तक्रारदारांनी फिर्याद दिली नाही.
बसल्याजागी पैसे कमावण्याचा धंदा
बनावट खाते तयार करून मित्र, नातेवाईक यांच्याकडे पाच ते दहा हजारापासून तर लाख रुपयांपर्यंतची मागणी झालेली आहे. खूप संकटात आहे, दवाखान्यात उपचारासाठी पैशाची गरज आहे, अशी कारणं सांगून पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार सर्रास सुरू झालेले आहेत. संबंधित व्यक्ती ज्या खात्यावर पैसे मागविते ते खाते देखील बनावट असते. त्यामुळे हे गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडत नाही. दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यातील गुन्हेगार यात सक्रिय होते, आता राज्यातील गुन्हेगार देखील यात सक्रिय झाले आहेत. मराठीतून ते संवाद साधत आहेत. काही प्रकरणात पुरुषच महिलांच्या नावाने बनावट खाते तयार करुन ब्लॅकमेलिंग करीत आहेत.
पोलिसांच्याही नावाचा वापर
जळगाव शहरात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे गणवेशातील फोटो असलेले बनावट खाते तयार करुन नातेवाईकांना पैसे मारण्यात आले. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, रामानंद नगरचे सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी तसेच नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांच्या फेसबुकवर बनावट खाते उघडून त्यांच्या नावाने पैसे मागण्याचा प्रकार घडला होता. त्यांच्या नावाने मित्रांना पैसे मागण्यात आले होते. डॉ. सुपेकर यांच्या मित्राला तर ५० हजार रुपयांचा भूर्दंड बसला होता.
फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
ज्यांची फेसबुक प्रोफाइल बनावट तयार केली आहे, त्यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक खात्यावरून बनवलेली बनावट प्रोफाइल शोधावी. स्वतःला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाइलवरून रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून बनावट प्रोफाईलची फेसबुक लिंक (युआरएल) मागवून घ्यावी. त्या प्रोफाईलवर गेल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा. तुमच्यासमोर फाईन सपोर्ट ऑफ रिपोर्ट प्रोफाइल हा ऑप्शन दिसेल, अशी त्यावर क्लिक करा प्री-टेंडिंग टू बी सोमिआॅन हा पहिला ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. पुढे तीन ऑप्शन दिसतील. मी,ए फ्रेंड आणि सेलिब्रिटी. आपण आपली बनवलेली बनावट प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी मी हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा फेक प्रोफाइल खाते काहीवेळाने बंद होईल.
कोट...
फेसबुकच्या बनावट खात्यावरून पैशाची मागणी होत असल्यास कोणीही व्यवहार करू नये. खातेदाराने तातडीने खाते बंद करून फेसबुकवर पैसे न देण्याबाबत मेसेज टाकावा. शक्यतो आपली प्रोफाईल लाॅक ठेवावी. स्वत: तसेच कुटुंबाचे फोटो अपलोड करणे टाळा. धमक्यांना घाबरू नये, शंका आल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.
- डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक