महिनाअखेर निवडणूक कर्मचाऱ्यांची माहिती न पाठविल्यास गुन्हे दाखल करा - जळगाव जिल्हाधिका-यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:55 PM2018-12-29T12:55:50+5:302018-12-29T12:56:18+5:30
चार हजार कर्मचा-यांची माहितीच आली नाही
जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २५ हजार कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचे नियोजन असून त्यापैकी अद्यापपर्यंत केवळ २१ हजार कर्मचाºयांची माहिती निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली आहे. उर्वरित चार हजार कर्मचाºयांची माहिती अद्यापही विविध कार्यालयांच्या विभागप्रमुखांनी पाठविली नसल्याने ही माहिती डिसेंबर अखेर सादर न केल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शुक्रवारी दिले.
जिल्हा प्रशासनातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. १५ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादी तयार करण्याची अंतिम तयारी सुरू आहे. मात्र शिक्षण विभागाने अद्यापही माहिती दिलेली नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत समोर आली.
निवडणूक जाहीर झाल्यास लागलीच कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) यासह विविध शासकीय विभागांना, शाळांना, महाविद्यालयांना नोटीस देवून नेमण्यात येणाºया कर्मचाºयांची माहिती मागविली आहे. मात्र शिक्षण विभागाने अद्यापही माहिती दिली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य आदीं प्रमुखांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.
सोबतच जे अधिकारी, मुख्याध्यापक खोटी माहिती सादर करतील, आपल्या मर्जीतील कर्मचाºयांची निवडणुकीसाठी ड्यूटी लावणार नाहीत अशांचा अहवाल मागवून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
बैठकीस उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भामरे, तहसीलदार अमोल निकम आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील चार हजार कर्मचाºयांची माहिती एकत्रित करून सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच अधिकाºयांचे पथक नेमले आहे. त्यात राष्ट्रीय विज्ञान केंद्राचे प्रमुख पी.डी. बोरोले, तहसीलदार (महसूल) पंकज लोखंडे, महेश पत्की, योगेश पाटील यांची निवड केली आहे.