रुग्णसंख्या वाढल्यास टप्प्याटप्प्यात कोविड केअर सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:19 AM2021-02-25T04:19:28+5:302021-02-25T04:19:28+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या मनपा प्रशासनाला सूचना : शहरातील उपाययोजनांचा घेतला आढावा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या मनपा प्रशासनाला सूचना : शहरातील उपाययोजनांचा घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यासाठी मनपा प्रशासनाने वेळेआधीच नियोजन करणे गरजेचे आहे. रुग्णवाढीची वाट न बघता सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच रुग्णसंख्या वाढल्यास टप्प्याटप्प्यात कोविड केअर सेंटर सुरु करा अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपाकडून होत असलेल्या उपाययोजनांबाबतचा आढावा बुधवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला. यावेळी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील यांच्यासह मनपाच्या वैद्यकीय विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. शहरात आलेल्या पहिल्या लाटेच्या वेळेस मनपा प्रशासनाने ज्याप्रकारे संपूर्ण यंत्रणा राबविली होती. त्याचप्रमाणे यावेळेस देखील यंत्रणा राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
सर्व इमारती तयार ठेवा
महापालिकेने पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहाच्या ज्या इमारती कोविड केअर सेंटरसाठी घेतल्या होत्या. त्या इमारती पुन्हा संपूर्ण यंत्रणेसह तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा गरज पडल्यास पुन्हा भराव्या लागणार असून, यासाठीही रुग्णसंख्येचा विचार करून लवकर निर्णय घ्यावा अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासह शहरातील गर्दीबाबतदेखील कडक भूमिका घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.